मेलबर्न : ‘एआय’च्या अतिवापरामुळे मनुष्याच्या कल्पकतेवर, सृजनशीलतेवर विपरीत परिणाम होत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. ‘एआय’मुळे एकीकडे, मनुष्याची विचार करण्याची क्षमता कमी होत असून दुसरीकडे, यामुळे आपणच आपल्याला बौद्धिकद़ृष्ट्या कमकुवत बनवत चाललो असल्याचे यात म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट आणि कार्नेनी मेलन विद्यापीठाच्या पथकाने याबाबत संशोधन केले आहे.
‘एआय’कडून ज्या वेगाने, तत्परतेने आपल्याला हवी ती माहिती आपल्याला उपलब्ध होते आहे, ते पाहता याचा आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर, टीकात्मक विचारपद्धतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे कोणत्याही विषयावर व्यवस्थित विचार करून, समजून-उमजून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो. यामध्ये कोणत्याही बाबतीत प्रश्न उपस्थित करणे, त्याची व्याख्या निश्चित करणे व त्याचे मूल्यांकन करणे याचा समावेश होतो. एकूण 319 डॉक्टर, शिक्षक व इंजिनिअर्सवर यात अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासात असे आढळून आले की, ज्यांनी ‘एआय’चा अधिक वापर केला, त्यांची टीकात्मक, समीक्षणात्मक विचारपद्धती कमी होत गेली. याचवेळी ज्यांनी एआयपेक्षा स्वत:वर विश्वास ठेवला, त्यांचे समीक्षण अधिक सरस ठरले. शिवाय, त्यांच्या कामकाजात अधिक कौशल्य आढळून आले. या सर्व पार्श्वभूमीवर, ‘एआय’चा गुलाम बनण्यापेक्षा त्याचा आपला सहायक म्हणून उपयोग करणे अधिक फायदेशीर ठरते, असे या अभ्यासकांनी नमूद केले आहे. ‘एआय’चा वापर करताना आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवली तर आपली विचार करण्याची पद्धत, तर्कशक्ती शाबूत राहते. एआय आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मात्र, एआयच्या माध्यमातून मिळणार्या माहितीवर जादा लक्ष पुरवावे लागते. ‘एआय’चा उपयोग करता करता आपली सारासार विचार करण्याची पद्धत जैसे थे राहील, यावर भर द्यावा, याचाही या अभ्यासकांनी शेवटी उल्लेख केला आहे.