न्यूयॉर्क : आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच ‘एआय’चा उपयोग आता लोक विविध कामांसाठी करत आहेत. दैनंदिन कामांमध्ये एआयचा फायदा होत आहेच, मात्र आता अमेरिकेतील एका महिलेला ‘चॅटजीपीटी’च्या मदतीने तब्बल दीड कोटीची लॉटरी लागल्याचे समोर आले आहे. महिलेने एआयकडे तिला लॉटरीसाठी नंबर मागितला आणि एआयने दिलेला नंबर तिच्यासाठी लकी ठरला. एआयच्या अशा वापराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या कॅरी एडवर्डस् यांनी 8 सप्टेंबर रोजी व्हर्जिनिया लॉटरी पॉवरबॉल ड्रॉमध्ये ‘चॅटजीपीटी’ला नंबर निवडायला सांगितल्यानंतर तिला जॅकपॉट लागला.. ‘एआय’ द्वारे तयार झालेल्या क्रमांकांनी पहिल्या पाच क्रमांकांपैकी चार आणि पॉवरबॉलला जुळवले, ज्यामुळे त्यांना 50,000 डॉलर्सचे बक्षीस मिळाले. परंतु, त्यांनी 1 डॉलर पॉवर प्ले वैशिष्ट्याचा पर्याय निवडल्याने त्यांची रक्कम वाढून 1,50,000 डॉलर्स (सुमारे 1.32 कोटी रुपये) झाली, अशी माहिती न्यूयॉर्क पोस्टने दिली आहे.
एडवर्डस् यांनी सांगितले की, तिकीट खरेदी करताना त्यांनी ‘चॅटजीपीटी’ला ‘माझ्याशी बोल’ आणि ‘माझ्यासाठी नंबर दे’ असे सांगितले. त्यानंतर एआयने त्या महिलेला लॉटरीचा नंबर सुचवला. दोन दिवसांनंतर, त्यांना त्यांच्या फोनवर बक्षीस जिंकल्याची नोटिफिकेशन मिळाली. सुरुवातीला त्यांना वाटले की हा एक प्रकारचा स्कॅम (घोटाळा) आहे. त्यांनी विचार केला, ‘मला माहीत आहे की मी जिंकले नाही.’ पण लवकरच त्यांना कळले की ‘एआय’ने दिलेल्या क्रमांकांमुळे त्यांना ही मोठी रक्कम मिळाली आहे. मात्र दीड कोटीची लॉटरी लागल्यानंतर या महिलेने उधळपट्टी न करता पैसे दान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.