वॉशिंग्टन : वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. कॅन्सरसारख्या (कर्करोग) प्राणघातक आजाराविरुद्धच्या लढ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि प्रगत बायोटेक्नॉलॉजीने असे यश संपादन केले आहे, ज्याची काही वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. अमेरिकन बायोटेक कंपनी ‘मॉडर्ना’ आणि ‘मर्क’ यांनी एआयच्या साहाय्याने जगातील पहिली ‘पर्सन्लाईज्ड कॅन्सर व्हॅक्सिन’ (Personalized Cancer Vaccine) तयार केली आहे. स्किन कॅन्सरच्या (त्वचेचा कर्करोग) शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवर झालेल्या मोठ्या प्रमाणावरील तिसऱ्या टप्प्यातील (Phase-3) चाचण्यांमध्ये याचे निकाल अत्यंत अचूक आणि दिलासादायक आले आहेत. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ याला कॅन्सरच्या उपचारांचे नवीन भविष्य मानत आहेत.
या नवीन तंत्रज्ञानाबाबत टेक क्षेत्रातील दिग्गज आणि अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘‘आर्टिफिशियल आरएनए (RNA) तंत्रज्ञानामुळे आता आजार बरे करणे हा एक प्रकारे सॉफ्टवेअरचा प्रश्न (Software Problem) बनला आहे.’’ कोव्हिड काळात जरी याचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असला, तरी आजारांवरील उपचारांमध्ये एमआरएनए (mRNA) तंत्रज्ञानाचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या शोधाचे कौतुक करत याला वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठा शोध म्हटले आहे. ही ‘पर्सनल व्हॅक्सिन’ सामान्य केमोथेरपीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
केमोथेरपीमध्ये निरोगी पेशींचेही नुकसान होते; मात्र ही लस थेट रुग्णाच्या ट्यूमरवर (गाठीवर) हल्ला करते. प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सर ट्यूमरचे म्यूटेशन (बदल) वेगळे असते, त्यामुळे ही लससुद्धा प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिकरीत्या बनवली जाते. ट्यूमरची जेनेटिक सिक्वेन्सिंग : सर्वप्रथम शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या ट्यूमरचा नमुना काढून त्याची आनुवंशिक तपासणी (Genetic Testing) केली जाते. एआयद्वारे म्यूटेशनची ओळख : ट्यूमरमध्ये असलेल्या शेकडो म्यूटेशन्सपैकी एआय सर्वात प्रभावी अशा ३४ म्यूटेशन्सची ओळख पटवते आणि त्यांचे रँकिंग करते.
एमआरएनए (mRNA) व्हॅक्सिन : ऑटोमेटेड सॉफ्टवेअर या निवडक म्यूटेशन्सच्या आधारे सूचना तयार करते, ज्यानंतर ही लस तयार केली जाते. इम्यून सिस्टीमचा हल्ला : लस दिल्यानंतर रुग्णाची प्रतिकारशक्ती स्वतःच कॅन्सरच्या पेशींची ओळख पटवून त्यांना नष्ट करण्यास सुरुवात करते. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि ज्यांच्यामध्ये कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा अत्यंत उच्च धोका होता, अशा १,००० हून अधिक मेलानोमा रुग्णांवर ही चाचणी घेण्यात आली. मर्क कंपनीच्या ‘कीट्रुडा’ या इम्युनोथेरपी औषधासोबत जेव्हा ही लस देण्यात आली, तेव्हा तिने कॅन्सरला पुन्हा पसरण्यापासून यशस्वीरीत्या रोखले.