विश्वसंचार

Walking Camera | ‘एआय चष्मा’ बनवणार ‘वॉकिंग कॅमेरा’

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : मोबाईल तंत्रज्ञानाचे पुढील युग सामान्य नागरिकांना ‘वॉकिंग कॅमेरा’ (चालता-बोलता कॅमेरा) बनवेल. कारण, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणारे 'स्मार्ट चष्मे' ( स्‍मार्ट ग्‍लासेस) युजर्स जे काही पाहतील आणि ऐकतील त्यावर रिअल-टाईममध्ये लक्ष ठेवतील, असे भाकीत क्वालकॉमचे सीईओ ख्रिस्‍तियानो अमोन यांनी केले आहे. 'मॉर्निंग्स विथ मारिया' या कार्यक्रमात बोलताना अमोन यांनी स्पष्ट केले की, भविष्यातील अति-वेगवान ६जी नेटवर्कमुळे हे स्मार्ट चष्मे त्यांनी गोळा केलेली माहिती थेट एआय मॉडेल्सना पाठवू शकतील, त्‍यामुळे तंत्रज्ञान क्षेत्र आणि मानवी जीवन पूर्णपणे बदलून जाईल.

मानवी शरीराचा वापर आणि एआय

सीईओ अमोन यांच्या मते, आपण संगणकाशी अगदी माणसांसारखाच संवाद साधू शकू. यामध्ये 'चष्मा' हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणार आहे. कारण, तो आपल्या डोळ्यांच्या, कानांच्या आणि तोंडाच्या अगदी जवळ असतो. आपण जे पाहू, ऐकू किंवा वाचू, ते सर्व एआय सहज पाहू आणि समजून घेऊ शकेल, त्‍यामुळे आपल्याला अत्यंत वेगाने माहिती व बुद्धिमत्ता (इंटेलिजेन्‍स) प्राप्त होईल. सध्या मेटा, गुगल आणि अ‍ॅपल यांसारख्या दिग्गज कंपन्या एआय-आधारित स्मार्ट चष्मे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. नुकतेच मेटा कंपनीने त्यांच्या 'म्युझ स्पार्क' या एआय तंत्रज्ञानावर चालणारे स्वस्त एआय चष्मे बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

क्वालकॉमची मेटासोबत भागीदारी

क्वालकॉम कंपनी प्रामुख्याने स्मार्टफोनला इंटरनेटशी जोडणारे चिप्स बनवण्यासाठी ओळखली जाते. परंतु, आता या कंपनीने डेटा सेंटर्स आणि एआय सॉफ्टवेअर क्षेत्रात स्वतःचा विस्तार केला आहे. या आठवड्यात क्वालकॉमने मेटा कंपनीच्या वाढत्या कॉम्प्युटिंग गरजा पूर्ण करण्यासाठी एका नवीन भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत क्वालकॉमने 'ड्रॅगनफ्लाय सी १०००' नावाचे नवीन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू) सादर केले आहे, तर वापर मेटा करत आहे. याशिवाय, क्वालकॉम कंपनी 'मॉड्युलर' या एआय स्टार्टअपचे अधिग्रहण करण्याची देखील योजना आखत आहे. कंपनीमध्ये होत असलेल्या या क्रांतिकारी बदलांवर बोलताना अमोन म्हणाले, "हे आता तुमच्या वडिलांच्या काळातील जुने क्वालकॉम राहिलेले नाही, तर ही एका नवीन युगाची सुरुवात आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT