लंडन : कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार केलेले चेहरे इतके वास्तववादी झाले आहेत की, अगदी ‘सुपर रेकग्नायझर्स’ (चेहरे ओळखण्यात अत्यंत निष्णात व्यक्ती) देखील खरे आणि बनावट यातील फरक ओळखण्यात अपयशी ठरत आहेत. एका नवीन संशोधनानुसार, सामान्य लोकांची स्थिती तर अधिकच गंभीर असून, ते अनेकदा ‘एआय’ने बनवलेल्या चेहर्यांनाच खरे मानण्याची चूक करत आहेत.
‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. ‘सुपर रेकग्नायझर्स’ हा अशा लोकांचा गट आहे ज्यांच्याकडे चेहरे ओळखण्याची नैसर्गिक आणि विलक्षण क्षमता असते. मात्र, अभ्यासात असे दिसून आले की, एआय निर्मित चेहर्यांच्या बाबतीत त्यांची अचूकता ही केवळ एखाद्या ‘अंदाजा’ इतकीच मर्यादित होती. सामान्य लोक तर अनेकदा खर्या चेहर्यांपेक्षा एआय चेहर्यांनाच अधिक ‘वास्तववादी’ मानतात, ज्याला ‘हायपररिअलिझम’ असे म्हटले जाते. या संशोधनात एक सकारात्मक बाबही समोर आली आहे. युनिव्हसिर्र्टी ऑफ रीडिंगमधील मानसशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका केटी ग्रे यांनी सांगितले की, ‘एआय फोटोमधील सामान्य चुका कशा ओळखायच्या, याचे केवळ पाच मिनिटांचे प्रशिक्षण दिल्यानंतर दोन्ही गटांच्या (सामान्य आणि तज्ज्ञ) कामगिरीत मोठी सुधारणा झाली.’ प्रशिक्षणानंतर दोन्ही गटांची अचूकता सारख्याच प्रमाणात वाढली. यावरून असे सूचित होते की, ‘सुपर रेकग्नायझर्स’ हे केवळ तांत्रिक चुकाच शोधत नाहीत, तर त्यांच्याकडे ओळखण्यासाठी इतरही काही नैसर्गिक क्लृप्त्या असू शकतात. हे चेहरे ‘जनरेटिव्ह अॅडव्हर्सरियल नेटवर्क्स’ नावाच्या अल्गोरिदमद्वारे तयार केले जातात. यात दोन टप्पे असतात. 1) जनरेटर : हा प्रत्यक्ष प्रतिमांच्या आधारे नवीन बनावट चेहरा तयार करतो. 2) डिस्क्रिमिनेटर : हा तो चेहरा खरा आहे की बनावट हे तपासतो. वारंवार होणार्या या प्रक्रियेमुळे बनावट प्रतिमा इतक्या हुबेहूब बनतात की, त्या मानवी डोळ्यांना फसवू शकतात.
एआय चेहरे ओळखण्यासाठी काही टिप्स : संशोधकांनी प्रशिक्षणादरम्यान काही महत्त्वाच्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे, ज्यावरून एआय चेहरे ओळखता येऊ शकतात. दातांची ठेवण : चेहर्याच्या अगदी मध्यभागी एखादा दात असणे. केसांची ओळ : डोक्यावरील केसांची ओळ विचित्र किंवा अस्पष्ट दिसणे. त्वचेचा पोत : त्वचा नैसर्गिक वाटण्याऐवजी खूपच गुळगुळीत किंवा अस्वाभाविक वाटणे.