AI voice technology | ‘एआय’निर्मित आणि खरा आवाज यामधील फरक झाला धूसर Pudhari File Photo
विश्वसंचार

AI voice technology | ‘एआय’निर्मित आणि खरा आवाज यामधील फरक झाला धूसर

इटलीत ‘एआय’च्या मदतीने संरक्षणमंत्र्यांच्या आवाजात मागितले होते पैसे!

पुढारी वृत्तसेवा

रोम : ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हल्ली सर्वच क्षेत्रांत होत आहे. कोणतीही शक्ती, ज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल, हे सर्वस्वी वापरकर्त्यावर अवलंबून असते. अर्थातच, ‘एआय’चा गैरवापरही सुरूच आहे. ‘डीपफेक’मुळे काय काय घडले हे सर्वांनाच ठाऊक आहे. असाच एक प्रकार इटलीत घडला होता. या वर्षाच्या सुरुवातीला इटलीमधील अनेक श्रीमंत व्यावसायिकांना एक धक्कादायक फोन कॉल आला. बोलणार्‍या व्यक्तीचा आवाज हुबेहूब संरक्षणमंत्री गुईडो क्रोसेट्टो यांच्यासारखा होता. त्या आवाजाने एक खास विनंती केली, ‘कृपया मध्य पूर्वेत ओलीस ठेवलेल्या इटालियन पत्रकारांना सोडवण्यासाठी आम्हाला पैसे पाठवा.’ परंतु, फोनवर बोलणारी व्यक्ती क्रोसेट्टो नव्हते. अनेक उद्योजकांनी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा क्रोसेट्टो यांना या कॉलची माहिती मिळाली. तपासानंतर हे स्पष्ट झाले की, फसवणूक करणार्‍यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून क्रोसेट्टो यांचा बनावट आवाज तयार केला होता.

एआय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता अत्यंत वास्तविक वाटणारे व्हॉईसओव्हर आणि ध्वनिमुद्रण तयार करणे शक्य झाले आहे. खरं तर, नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, एआय-जनरेटेड आवाज आता खर्‍या मानवी आवाजापेक्षा वेगळे ओळखणे अशक्य झाले आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला अनेक इटालियन उद्योजक आणि व्यावसायिकांना हे फोन कॉल आले. या घटनेच्या अवघ्या एका महिन्यापूर्वी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इराणमध्ये कैदेत असलेल्या इटालियन पत्रकार सेसिलिया साला यांची सुटका केली होती. या ‘डीपफेक’ कॉलमध्ये, क्रोसेट्टो यांच्या बनावट आवाजाने व्यावसायिकांना एका परदेशातील बँक खात्यात अंदाजे 10 लाख युरो (सुमारे 1.17 दशलक्ष डॉलर) हस्तांतरित करण्याची विनंती केली.

बँक खात्याचे तपशील कॉलदरम्यान किंवा क्रोसेट्टो यांच्या कर्मचार्‍यांचे असल्याचे भासवणार्‍या इतर कॉल्समध्ये पुरवले गेले. 6 फेब्रुवारी रोजी क्रोसेट्टो यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करून माहिती दिली. 4 फेब्रुवारी रोजी त्यांना ‘एक मित्र, एक प्रमुख उद्योजक’ यांचा कॉल आला होता. त्या मित्राने क्रोसेट्टो यांना विचारले की, त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल आला होता का. क्रोसेट्टो यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी त्याला सांगितले की, हे पूर्णपणे असंभाव्य (absurd) आहे; कारण माझ्याकडे त्याचा क्रमांक आधीच आहे. असे शक्य नाही.’ यानंतर क्रोसेट्टो यांना एका दुसर्‍या व्यावसायिकाने संपर्क साधला, ज्याने एका ‘जनरल’ नावाच्या व्यक्तीच्या कॉलमुळे मोठी रक्कम हस्तांतरित केली होती.

क्रोसेट्टो म्हणाले, ‘त्याने मला फोन केला आणि सांगितले की, माझा आणि त्यानंतर एका जनरलचा कॉल आल्यानंतर त्याने जनरलने दिलेल्या खात्यात खूप मोठी रक्कम हस्तांतरित केली आहे. मी त्याला सांगितले की, ही एक फसवणूक आहे आणि मी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यांनी त्याच्या घरी जाऊन तक्रार नोंदवून घेतली.’ फसवणूक करणार्‍यांच्या निशाण्यावर इटलीतील काही सर्वात प्रसिद्ध व्यावसायिक होते, ज्यात दिवंगत फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी आणि ‘प्राडा’चे सह-संस्थापक पॅट्रिझिओ बर्टेली यांचा समावेश होता.

परंतु, अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, इंटर मिलान फुटबॉल क्लबचे माजी मालक मासिमो मोराती यांनीच प्रत्यक्षात विनंती केलेली रक्कम पाठवली. पोलिसांनी त्यांनी हस्तांतरित केलेली रक्कम शोधून गोठवली आहे. मोराती यांनी शहरातील सरकारी वकिलांच्या कार्यालयात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी इटालियन माध्यमांना सांगितले, ‘मी अर्थातच तक्रार दाखल केली आहे; पण मी त्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही. तपास कसा होतो ते पाहूया. हे सर्व वास्तविक वाटले. ते खूप हुशार होते. हे कोणासोबतही घडू शकते.’ क्रोसेट्टो यांनी ही सर्व वस्तुस्थिती जाहीर करणे पसंत केले, जेणेकरून इतर कोणी या फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT