AI Enzyme System | ‘एआय’ने लावला असामान्य एंझाइम सिस्टीमचा शोध 
विश्वसंचार

AI Enzyme System | ‘एआय’ने लावला असामान्य एंझाइम सिस्टीमचा शोध

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रसिद्ध एआय सुरक्षा आणि संशोधन संस्था ‘अँथ्रोपिक’ने एका मोठ्या वैज्ञानिक यशाचा दावा केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ‘क्लॉड’ या एआय मॉडेलने एका नवीन ‘एंझाइम सिस्टीम’च्या शोधात मोलाची मदत केली आहे. या सिस्टीमची वैशिष्ट्ये जनुक संपादन तंत्रज्ञानातील (Gene Editing Technology) प्रसिद्ध ‘CRISPR’ च्या कार्यपद्धतीसारखीच आहेत. एआय स्टार्टअपच्या बायोलॉजी रिसर्च (जीवशास्त्र संशोधन) क्षेत्रातील प्रयत्नांचे हे पहिले मोठे फळ मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘रॉयटर्स’च्या एका अहवालात अँथ्रोपिकने सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये गुपचूपपणे एक ‘वेट लॅब’ उभारल्याचे समोर आले होते. त्यानंतर लगेचच हा मोठा शोध समोर आला आहे. कंपनी आता केवळ संगणक-आधारित कामांपुरती मर्यादित न राहता लाईफ सायन्सेस आणि औषध निर्माण क्षेत्रातील संशोधनात आपला विस्तार करत आहे. अँथ्रोपिकने दिलेल्या माहितीनुसार : ‘क्लॉड’ने मोठ्या प्रमाणातील डीएनए डेटाबेसचे सखोल विश्लेषण केले आणि ‘रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज’ (आरटी) वर आधारित एक अनोखी सिस्टीम शोधून काढली. ‘आरटी’ हे असे एंझाइम आहे जे आरएनएची कॉपी डीएनए मध्ये तयार करते.

अँथ्रोपिकने या सिस्टीमचे नाव ‘एरे-असोसिएटेड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज’ (ART) असे ठेवले आहे. अँथ्रोपिकच्या मते, ‘ART’ मध्ये वारंवार पुनरावृत्ती होणारे असे डीएनए सीक्वेन्स आहेत, ज्यांचे पॅटर्न ‘CRISPR’ मध्ये दिसणाऱ्या पॅटर्नसारखेच आहेत. कंपनीने स्पष्ट केले की, याआधीच्या अभ्यासांमध्ये ‘आरटी’ची ओळख पटली होती; परंतु क्लॉडनेच सर्वात आधी या मोठ्या सिस्टीमच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांना अचूकपणे ओळखले आहे. या वैशिष्ट्यांमध्ये नॉन-कोडिंग डीएनए सीक्वेन्सची एक एरे आणि अज्ञात कार्यप्रणाली असलेला एक अतिरिक्त प्रोटीन समाविष्ट आहे. या शोधामुळे भविष्यात वैद्यकीय आणि जनुक संपादन क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT