विश्वसंचार

AI Diet Plan Risk | ‘एआय’च्या डाएट प्लॅनमुळे व्यक्ती पोहोचली थेट रुग्णालयात

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वरील वाढता विश्वास कधीकधी किती धोकादायक ठरू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. चॅटजीपीटीकडून डाएट प्लॅन घेऊन तो कसोशीने पाळणार्‍या एका 60 वर्षीय व्यक्तीला तीन महिन्यांतच गंभीर मानसिक त्रासामुळे रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल व्हावे लागले. त्याला पॅरानोइया (सगळे आपल्या विरोधात आहेत असे वाटणे) आणि हॅल्युसिनेशन (भ्रम होणे) यांसारखी लक्षणे दिसू लागली होती.

वैद्यकीय तपासणीत उघड झाले की, या व्यक्तीला ‘ब्रोमिझम’ (Bromism) नावाचा एक दुर्मीळ पण गंभीर सिंड्रोम झाला होता. ब्रोमाइड किंवा ब्रोमिन नावाच्या रासायनिक संयुगाच्या अतिसेवनामुळे हा आजार होतो. या प्रकरणात, त्या व्यक्तीने चॅटजीपीटीच्या सल्ल्यानंतर ऑनलाईन सोडियम ब्रोमाईड खरेदी करून त्याचे सेवन करण्यास सुरुवात केली होती. हे प्रकरण मंगळवारी (5 ऑगस्ट) ‘अ‍ॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन क्लिनिकल केसेस’ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.

या घटनेनंतर चॅटजीपीटीची निर्मिती करणार्‍या ‘ओपनएआय’ कंपनीशी संपर्क साधला असता, त्यांच्या प्रवक्त्याने कंपनीच्या सेवाशर्तींकडे लक्ष वेधले. या शर्तींमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘आमच्या सेवा कोणत्याही आरोग्यविषयक समस्येचे निदान किंवा उपचारांसाठी नाहीत. आमच्या सेवांमधून मिळणार्‍या माहितीवर एकमेव सत्य किंवा व्यावसायिक सल्ल्याचा पर्याय म्हणून अवलंबून राहू नये.’ 19 व्या आणि 20 व्या शतकात, ब्रोमाइडचा वापर शामक औषधे (sedatives), झोपेची औषधे आणि आकडीवरील उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असे. मात्र, कालांतराने हे स्पष्ट झाले की याच्या दीर्घकाळ सेवनाने ‘ब्रोमिझम’ नावाचा गंभीर आजार होतो.

टॉक्सिड्रोम (Toxidrome) हा शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे होणारा हा एक सिंड्रोम आहे. यामुळे सायकोसिस, उन्माद, भ्रम यांसारखी गंभीर मानसिक लक्षणे दिसू शकतात. तसेच, स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि स्नायूंच्या समन्वयावरही याचा परिणाम होतो. ब्रोमाईड शरीरात हळूहळू साचते आणि मेंदूतील न्यूरॉन्सच्या (मज्जापेशी) कार्यामध्ये अडथळा आणते, ज्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी, आरोग्यविषयक बाबतीत ते मानवी तज्ञांची जागा घेऊ शकत नाही. सोप्या आणि त्वरित उत्तरांच्या शोधात ‘एआय’ वर अवलंबून राहणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणताही आहार बदलण्यापूर्वी किंवा औषधोपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणेच सुरक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT