AI Invisible Drone | ‘एआय’ने बनवला चक्क ‘अदृश्य’ ड्रोन!  
विश्वसंचार

AI Invisible Drone | ‘एआय’ने बनवला चक्क ‘अदृश्य’ ड्रोन!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : तुमच्या डोळ्यांसमोर एक ड्रोन उडत आहे; पण तो तुम्हाला दिसतच नाही... अशा तंत्रज्ञानाचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ‘नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी’च्या अभियंत्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’च्या मदतीने असाच एक अनोखा ड्रोन तयार केला आहे, जो डोळ्यांसमोर असूनही सहजासहजी नजरेस पडत नाही. अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ पारदर्शक किंवा सरड्यासारखा रंग बदलणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर या टीमला ‘मोशन ब्लर’ या संकल्पनेचा वापर करून असा ‘अदृश्य’ ड्रोन बनवण्यात यश आले आहे.

या ड्रोनचे नाव ‘फॅन्टम ट्विस्ट’ असे ठेवण्यात आले आहे. नावाप्रमाणेच हा ड्रोन हवेत एका सेकंदात तब्बल २५ वेळा स्वतःभोवती गोल फिरतो. इतक्या वेगवान गतीमुळे तो हवेत गायब झाल्यासारखा वाटतो. आपण घरात चालणारा पंखा पाहतो, जेव्हा पंखा पूर्ण वेगाने फिरतो, तेव्हा जशा त्याच्या पात्या दिसणे बंद होतात, अगदी त्याच तंत्रज्ञानावर हा ड्रोन काम करतो. हा ड्रोन हवेत पूर्णपणे नाहीसा होत नाही, तर एका पुसटशा सावलीत बदलतो. त्यामुळे तो आजूबाजूच्या बॅकग्राऊंडमधील रंगांमध्ये हुबेहूब मिसळून जातो. सामान्य ड्रोनचे फक्त पंखे फिरतात आणि त्याची मुख्य बॉडी (भाग) स्थिर असते, ज्यामुळे तो स्पष्ट दिसतो. याउलट, ‘फॅन्टम ट्विस्ट’मध्ये फक्त एकच मोटर आणि एकच प्रोपेलर (पंखा) वापरण्यात आला आहे.

जेव्हा या ड्रोनचा पंखा एका दिशेने फिरतो, तेव्हा ड्रोनचा उरलेला संपूर्ण भाग विरुद्ध दिशेने फिरू लागतो. हा ड्रोन इतक्या वेगाने फिरतो की मानवी डोळे त्याचा कोणताही भाग स्पष्टपणे पाहू शकत नाहीत. या अतिवेगामुळे त्याचे सुटे भाग बॅकग्राऊंडमध्ये मिसळतात आणि केवळ धुक्यासारखा भास होतो. या ड्रोनची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे याची रचना ‘एआय’च्या मदतीने तयार करण्यात आली आहे. योग्य पद्धतीने उडू शकणाऱ्या तब्बल २०,००० वेगवेगळ्या डिझाईन्सची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर ‘एआय’च्या अल्गोरिदमने मोटर, बॅटरी, सर्किट बोर्ड आणि काऊंटरवेट यांसारख्या सर्व जड भागांना डिझाईनमध्ये अशा प्रकारे सेट केले, जेणेकरून फिरताना ते कमीत कमी दिसतील. या संपूर्ण प्रक्रियेनंतरच हे सर्वोत्कृष्ट मॉडेल तयार करण्यात आले.

कशासाठी ठरेल उपयुक्त?

हा ड्रोन सामान्य ड्रोनच्या तुलनेत १० पटीने कमी दिसतो. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा पर्यावरण आणि वन्यजीवांच्या देखरेखीसाठी होणार आहे. सहसा ड्रोनचा मोठा आकार पाहून पक्षी आणि प्राणी घाबरून पळून जातात. अशा परिस्थितीत, ‘फॅन्टम ट्विस्ट’च्या मदतीने पक्ष्यांची घरटी आणि जुन्या इमारतींची तपासणी कोणालाही त्रास न देता किंवा कोणाच्याही लक्षात न येता सहज करता येईल. इंजिनिअर्सचे पुढचे लक्ष्य पूर्णपणे गायब होणारा ड्रोन बनवण्याचे आहे. सध्याच्या फॅन्टम ट्विस्टमध्ये काही त्रुटी आहेत, ज्यामुळे तो थोडाफार दिसतो. तसेच, गोल फिरताना त्याचा हलका आवाजही येतो. हा आवाज बंद करण्यासाठी आणि ड्रोन आणखी अचूक बनवण्यासाठी भविष्यात ‘पूर्णपणे पारदर्शक मटेरियल’ आणि ‘शांत प्रोपेलर’चा वापर केला जाईल, जेणेकरून तो १०० टक्के अदृश्य होऊ शकेल, असे अभियंत्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT