Artificial Intelligence Chip Design | ‘एआय’ने बनवले ५०० पटींनी लहान चिप घटकांचे डिझाईन  
विश्वसंचार

Artificial Intelligence Chip Design | ‘एआय’ने बनवले ५०० पटींनी लहान चिप घटकांचे डिझाईन

फोटॉनिक मायक्रोचिप तंत्रज्ञानात मोठी क्रांती

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : शास्त्रज्ञांनी मायक्रोचिप तंत्रज्ञानात एक अभूतपूर्व यश संपादन केले असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने फोटॉनिक मायक्रोचिपमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीन मुख्य घटकांचा आकार तब्बल ५०० पटींनी लहान केला आहे. यामुळे चिपवरील इतर कार्यांसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. ‘एआय’च्या अल्गोरिदमने तयार केलेले हे डिझाईन मानवी कल्पनाशक्ती आणि तर्काच्या पूर्णपणे पलीकडचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

हे संशोधन वैज्ञानिक नियतकालिक ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित झाले आहे. पारंपरिक मायक्रोचिप माहितीचे वहन आणि प्रक्रिया करण्यासाठी इलेक्ट्रॉनचा वापर करतात. याउलट, फोटॉनिक मायक्रोचिप प्रकाशाच्या कणांचा म्हणजे फोटॉन्सचा वापर करतात. प्रकाश वेगाने माहिती प्रवास करत असल्याने या चिप्स इलेक्ट्रॉनिक्स चिप्सच्या तुलनेत अत्यंत जलद गतीने डेटा ट्रान्समिट करू शकतात. तसेच, यात उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जेचा होणारा अपव्यय खूप कमी होतो आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणात डेटा वाहून नेण्याची क्षमता मिळते. ज्या ठिकाणी अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात डेटा ट्रान्समिशनची गरज असते, अशा ठिकाणी फोटॉनिक चिप्सचा प्रामुख्याने वापर केला जातो.

त्यामध्ये फायबर-ऑप्टिक कम्युनिकेशन्स आणि डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि क्वांटम कॉम्प्युटिंग तसेच स्वयंचलित वाहनांसाठी लागणारी ‘लायडार’ (Lidar) सिस्टीम यांचा समावेश आहे. या फोटॉनिक चिप्समध्ये धातूच्या तारांऐवजी मायक्रोमीटर रुंदीच्या ‘वेव्हगाईडस्‌’ नावाच्या सूक्ष्म मार्गांद्वारे प्रकाश नियंत्रित केला जातो. याशिवाय चिपमध्ये वेव्हलेंथ स्पिलटर्स, स्पेशल मोड सॉर्टर्स आणि आरसे असे घटक असतात; जे मानवी केसाच्या व्यासापेक्षाही लहान जागेत प्रकाशाच्या विविध लहरींना वेगळे करण्याचे आणि दिशा देण्याचे काम करतात. नवीन अभ्यासात, संशोधकांनी ‘एआय’द्वारे तयार केलेल्या डिझाईनचा वापर करून हे तिन्ही घटक अत्यंत सूक्ष्म (Ultracompact) आकारात तयार करण्यात यश मिळवले आहे. ‘एआय’च्या या आधुनिक मॉडेलमुळे चिप्स अधिक शक्तिशाली आणि कॉम्पॅक्ट बनवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT