वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ आता केवळ चॅटिंग किंवा कामापुरते मर्यादित न राहता मानवी जीव वाचवण्यासाठी सज्ज झाले आहे. सेडार्स-सिनाई आणि जॉन्स हॉपकिन्स यांसारख्या जागतिक स्तरावरील नामांकित संस्थांच्या संशोधनातून समोर आले आहे की, ‘एआय’ मुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि अचानक येणार्या मृत्यूचा धोका अनेक वर्षे आधीच ओळखता येणार आहे. सेडार्स-सिनाईच्या संशोधनात ‘एआय’ ने 5 ते 10 वर्षे आधीच हार्ट अटॅकचा धोका 85 ते 95 टक्क्यांपर्यंत अचूकतेने ओळखला आहे.
जॉन्स हॉपकिन्सच्या मॉडेलने ‘हायपरट्रॉफिक कार्डियोमायोपॅथी’ (हृदयाचे स्नायू जाड होणे) या आजारात अचानक मृत्यूचा धोका 93 टक्के अचूकतेने सांगितला आहे. आरोग्य क्षेत्रात ‘एआय’चा वापर झपाट्याने वाढत असून, 2025 पर्यंत ही बाजारपेठ 21.66 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. एकट्या अमेरिकेत 66 टक्के डॉक्टर सध्या आरोग्य निदानासाठी ‘एआय’चा वापर करत आहेत. विशेषतः, हृदयविकार, कॅन्सर, स्ट्रोक आणि मधुमेहाच्या जोखमीचे भाकीत करण्यासाठी याचा वापर केला जात आहे.
1. सेडार्स-सिनाई: येथील संशोधकांनी सीटीए इमेजेस वापरून रक्तातील गुठळ्यांचे विश्लेषण केले. पारंपरिक पद्धतीपेक्षा ‘एआय’ने 5 वर्षांतील हार्ट अटॅकचा धोका अधिक अचूकपणे ओळखला.
2. जॉन्स हॉपकिन्स : येथील ‘एआय’ मॉडेलने एमआरआय स्कॅनद्वारे हृदयावरील जखमांच्या खुणा पाहून अचानक हृदयविकाराच्या झटक्याने होणार्या मृत्यूचा अंदाज 89-93 टक्के अचूक वर्तवला. विशेष म्हणजे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ही अचूकता केवळ 50 टक्के असते. ‘एआय’ तंत्रज्ञान जरी प्रभावी असले, तरी त्याचे काही नकारात्मक पैलूही तज्ज्ञांनी मांडले आहेत:
मानसिक ताण : मृत्यू किंवा गंभीर आजारांचे भाकीत केल्यामुळे लोकांमध्ये भीती आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
गोपनीयता : रुग्णांच्या डेटाची सुरक्षा आणि प्रायव्हसी ही एक मोठी चिंता आहे.
मानवी देखरेख : तंत्रज्ञानावर पूर्णपणे विसंबून न राहता मानवी निरीक्षण असणे अत्यंत गरजेचे आहे.