वॉशिंग्टन ः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इतक्या वेगाने धावत आहे की, माणूस हळूहळू मागे पडत चालला आहे. आता तर ‘एआय’चे ‘गॉडफादर’ म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनीही यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हिंटन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘एआय’ लवकरच स्वतःची स्वतंत्र भाषा तयार करू शकते, जी मानवी निर्मात्यांनाही समजणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या या भाकितामुळे भविष्यात ‘एआय’ मानवालाही मागे टाकेल, हे जवळपास निश्चित झाले आहे.
जेफ्री हिंटन यांनी ‘वन डिसिजन’ या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता, जिथे त्यांनी ‘एआय’च्या भविष्यातील धोक्यांवर उघडपणे भाष्य केले. त्यांच्या मते, ‘एआय’चा असा विकास भविष्यासाठी एक मोठे संकट बनू शकतो. पॉडकास्टमध्ये बोलताना हिंटन यांनी स्पष्ट केले की, सध्या ‘एआय’ ज्या पद्धतीने काम करतो ते आपण काही प्रमाणात समजू शकतो. सध्या ‘एआय’ ‘चेन ऑफ थॉटस्’ म्हणजेच विचारांच्या एका साखळीवर काम करतो.
या साखळीचा मागोवा घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता नक्की काय करत आहे, हे समजणे शक्य होते. मात्र, जर ‘एआय’ ने स्वतःची अंतर्गत भाषा विकसित केली आणि आपापसात त्याच भाषेत संवाद साधायला सुरुवात केली, तर ते अत्यंत भयावह असेल. असे झाल्यास ‘एआय’चा खरा हेतू काय आहे, हे माणसाला कधीच कळू शकणार नाही. हिंटन यांच्या मते, ‘मशिन्सनी यापूर्वीच अनेक भयानक कल्पना तयार केल्या आहेत आणि त्या आपण समजतो त्याच भाषेत असतील, असे नाही.
’ हिंटन यांनी ‘एआय’ आणि मानवाच्या शिकण्याच्या क्षमतेतील तफावतही स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘एआय माणसासारखा हळूहळू शिकणारा नाही. त्याच्याकडे प्रचंड वेगाने माहिती कॉपी-पेस्ट करण्याची क्षमता आहे.’ ‘एआय’च्या शिकण्याची क्षमता इतकी जास्त आहे की, माणूस त्याची बरोबरी करू शकत नाही. सध्या बाजारात असलेले ॠझढ-4 सारखे मॉडेल सामान्य ज्ञानात माणसाला आधीच मागे टाकू लागले आहेत. आता लवकरच ‘एआय’ आपली विचार करण्याची क्षमताही मागे टाकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.