नवी दिल्ली : भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात आर्टिफीशिअल इंटेलिजन्स (एआय) चा वापर वेगाने वाढत आहे. कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोघांचेही असे मत आहे की, ‘एआय’मुळे कामाचा दर्जा सुधारतो, डेटा समजून घेणे सोपे होते आणि अचूक निर्णय घेण्यास मदत होते. याच सकारात्मक द़ृष्टिकोनामुळे भारतीय कंपन्यांमध्ये ‘एआय’चा स्वीकार झपाट्याने होत असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.
या सर्वेक्षणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारताचा ‘टॅलेंट हेल्थ स्कोर’. भारताने 82 गुणांसह जगात अव्वल स्थान पटकावले आहे, तर जगाचा सरासरी स्कोर केवळ 65 आहे. कर्मचारी आपल्या कंपनीतील वातावरण, शिकण्याच्या संधी आणि त्यांना मिळणारा सन्मान याबद्दल किती समाधानी आहेत, हे या स्कोरवरून ठरते. भारतातील बहुतांश कर्मचार्यांच्या मते, त्यांचे मॅनेजर्स त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतात, ज्यामुळे कर्मचार्यांचा आत्मविश्वास वाढतो.
‘ईवाय इंडिया’चे पार्टनर अनुराग मलिक यांच्या मते, भारताने एआय तंत्रज्ञान आत्मसात करण्यात मोठी आघाडी घेतली आहे. सध्या कंपन्या तंत्रज्ञान, कर्मचार्यांचे कौशल्य आणि त्यांचा अनुभव यांचा योग्य समतोल राखण्यावर भर देत आहेत. ‘एआय’चा योग्य वापर केवळ कामाची क्षमताच नाही, तर कर्मचार्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत करत आहे. अहवालानुसार, भारतीय कर्मचार्यांसाठी बोनस, कामाच्या वेळेतील लवचिकता, योग्य पगार आणि आरोग्य सुविधा हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासोबतच, कंपन्या आता कर्मचार्यांना ‘एआय’ शी संबंधित प्रशिक्षण देण्याला प्राधान्य देत आहेत. 34 टक्के कंपन्यांनी ‘एआय स्किल डेव्हलपमेंट’ला आपल्या प्राधान्य सूचीत स्थान दिले आहे. तंत्रज्ञानासोबतच कर्मचार्यांच्या गरजांकडे लक्ष दिल्याने भारतीय टॅलेंट अधिक सक्षम होत असल्याचे चित्र आहे.