AI Bionic Eye | ‘एआय बायोनिक आय'मुळे अंधांना दृष्टीची आशा 
विश्वसंचार

AI Bionic Eye | ‘एआय बायोनिक आय'मुळे अंधांना दृष्टीची आशा

स्पेनमध्ये २७ वर्षीय तरुणावर यशस्वी प्रयोग; मेंदूतील हालचालींवर अचूक नियंत्रण

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद : अपघातात दृष्टी गमावलेल्या एका २७ वर्षीय तरुणाला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेंदूतील विशेष उपकरणाच्या मदतीने प्रकाशाचे कवडसे व आकार दिसू लागले आहेत. शास्त्रज्ञांनी विकसित केलेले हे 'एआय बायोनिक आय' तंत्रज्ञान भविष्यात अंध व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकते.

साधारणपणे डोळे मेंदूकडे संदेश पाठवतात, तेव्हा आपल्याला वस्तू दिसतात. मात्र, या प्रयोगात डोळ्यांऐवजी थेट मेंदूच्या दृश्य भागात ९६ इलेक्ट्रोड्स असलेले उपकरण बसवण्यात आले. युसी सांता बार्बरा, ईटीएच झुरिच आणि मिगुएल हर्नांडेझ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला.

एआयची नेमकी भूमिका काय?

विद्युत लहरींमुळे मेंदूत प्रकाशाचे ठिपके दिसतात, पण ते अचूक नियंत्रित करणे कठीण होते. शास्त्रज्ञांनी 'डीप लर्निंग' एआय मॉडेल वापरून मेंदूच्या प्रतिसादाचा अभ्यास केला. यामुळे कमी विद्युत प्रवाहात अधिक अचूक दृश्य संवेदना निर्माण करण्यात यश आले.

पुढील आव्हाने

सध्या हे तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत असून, एकाच व्यक्तीवर याची चाचणी झाली आहे. चेहऱ्यांची ओळख किंवा वाचनासाठी उपयुक्त दृष्टी देण्याकरिता अद्याप अधिक संशोधनाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT