विश्वसंचार

उत्तर आफ्रिकेत 7500 वर्षांपूर्वी सुरू झाली शेती

Arun Patil

न्यूयॉर्क : मानवी इतिहासात शेतीचा शोध हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. शेतीमुळे भटका माणूस एका जागी स्थिर झाला आणि त्याच्या अन्नपाण्याची ददातही मिटली. केवळ शिकारीवर अवलंबून राहणे थांबल्याने माणसाला आपल्या कर्तुत्वाला नव्या दिशा देण्यास वाव मिळू लागला. 'निओलिथिक' काळात शेती आणि पशुपालन सुरू झाले असे मानले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी इतिहासातील या सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतराबाबत अनेक प्रकारचे संशोधन केले जात आहे. आता एका नव्या संशोधनानुसार उत्तर आफ्रिकेमध्ये 7500 वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली. तिथे स्थलांतरित झालेल्या लोकांनी शेती सुरू केली. निओलिथिक काळातील लोकांच्या जीवाश्मातील डीएनएचा अभ्यास करून याबाबतचे संशोधन केले आहे.

सध्याच्या तुर्कीयेच्या भागातील या प्रागैतिहासिक शेतीबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. या एनाटोलियन पेनिन्सुलाच्या भागात काही स्थलांतरित लोकांनी आधी शेती सुरू केली आणि ही कला नंतर शिकार करणार्‍या मानवी समूहांनीही स्वीकारली. सुमारे 8500 वर्षांपूर्वीच्या काळात शेती करणार्‍या मानव समूहातील सदस्यांनी एजियन समुद्र ओलांडला. त्यांनी शेतीचे तंत्र सोबत आणले होते जे एनाटोलिया ते ग्रीस आणि बाल्कनपर्यंतच्या भागात सारखेच आहे. पाच शतकांनंतर यापैकीच काहींनी नंतर इटलीकडेही कूच केली.

आयबेरियन पेनिन्सुलामध्ये शेतीची सुरुवात 7600 वर्षांपूर्वी झाली. कॉर्सिका आणि सार्डिनियासारख्या बेटांवरही शेती सुरू झाली व नंतर ती युरोप खंडातील नद्यांच्या खोर्‍यातही पसरली. शेतीमुळे संबंधित भागांमध्ये लोकसंख्या वाढ होऊ लागली. शिकारी आणि शेती करणारी माणसे एकमेकांमध्ये मिसळून गेली. नवे भूप्रदेश, समाज बनू लागले. हे लोक मेसोलिथिक काळातील अखेरच्या समुदायाचे होते. या काळातील काही मातीची भांडीही युरोपपर्यंतच्या भागात आढळली आहेत. त्यावरील नक्षीकाम लक्षणीय आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT