वाराणसी : इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक पर्याय म्हणून समोर येत असली, तरी त्यांच्या मर्यादित रेंजमुळे मोठ्या प्रमाणावर स्वीकृती मिळण्यात अडथळा येतो. ही समस्या प्रामुख्याने बॅटरीची कमी क्षमता आणि चार्जिंगचा धीमा वेग यामुळे उद्भवते; मात्र आता भारतीय वैज्ञानिकांनी या समस्येवर प्रभावी तोडगा शोधला आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या (इकण) भौतिकशास्त्र विभागाच्या वैज्ञानिकांनी एक अत्याधुनिक रूम टेंपरेचर सोडियम-सल्फर बॅटरी विकसित केली आहे, जी पारंपरिक लीथियम-आयन बॅटरीपेक्षा अधिक स्वस्त, शक्तिशाली आणि कार्यक्षम आहे. ही सल्फर बॅटरी एकदा चार्ज झाल्यावर सुमारे 1300 कि.मी.ची रेंज देऊ शकते.
या नवीन सोडियम-सल्फर बॅटरीसाठीचा खर्च लीथियम-आयन आणि सोडियम-आयन बॅटरीच्या तुलनेत 35 टक्के कमी असेल. पारंपरिक चार्जिंग सायकलमध्ये ही बॅटरी 1300 कि.मी. पर्यंतचा प्रवास करण्यास सक्षम आहे. सोडियम-आयन बॅटरीच्या तुलनेत नवीन बॅटरीची ऊर्जा घनता 1274 वॉट-तास प्रतिकिलोग्रॅम आहे, जी अधिक अंतर कापण्यास मदत करते. सल्फर मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कचर्यातून उपलब्ध होत असल्याने ही बॅटरी पर्यावरणपूरक आहे. बीएचयूच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. राजेंद्र कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली सहा संशोधकांनी हे संशोधन केले. त्यांनी सोडियम आणि सल्फरच्या रासायनिक अभिक्रियेवर आधारित बॅटरी तयार केली असून, ती कमी तापमानातही कार्यक्षमतेने काम करू शकते. या प्रकल्पासाठी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट , बेंगळुरूसोबत करार करण्यात आला आहे. आगामी 2 वर्षांत बॅटरीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सोडियम-आयन बॅटरीमध्ये डिस्चार्ज क्षमता 170-175 मिली-अँपिअर-तास प्रति ग्रॅम असते आणि ऊर्जा घनता 150-180 वॉट-तास प्रति किलोग्रॅम असते, त्यामुळे चार्जिंगनंतर 250-300 कि.मी. रेंज मिळते. नवीन सोडियम-सल्फर बॅटरीमध्ये डिस्चार्ज क्षमता 1300-1400 मिली-अँपिअर-तास प्रतिग्रॅम असून, ऊर्जा घनता 1274 वॉट-तास प्रतिकिलोग्रॅम आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना 1200-1300 कि.मी. रेंज मिळते. या बॅटरीचे उत्पादन स्वस्त असले, तरी काही तांत्रिक अडचणी आहेत, जसे की पॉली-सल्फाईड डिसोल्यूशन, शटल इफेक्ट आणि कॅथोडमधील शॉर्ट सर्किट समस्या. मात्र, वैज्ञानिक हे अडथळे दूर करण्यासाठी सतत संशोधन करत आहेत.