विश्वसंचार

वाढत्या तापमानामुळे लहान मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम

Arun Patil

अ‍ॅमस्टरडम : जलवायू परिवर्तनामुळे तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले असताना याचा लहान मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले आहे. नेदरलँडमधील रॉटरडम विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला.

संशोधकांनी जन्मापूर्वी व जन्मानंतर कमी वयात अशा छोट्या मुलांचे मानसिक स्वास्थ व तापमानाचा प्रभाव याचा तुलनात्मक अभ्यास केला. यावेळी असे आढळून आले की, गर्भावस्थेत किंवा लहान वयात मुले उष्णतेच्या संपर्कात आले तर त्यांच्या मेंदूतील माईलिनेशनचा स्तर कमी होतो. यामुळे मेंदूतील न्यूरोलॉजिकल तंत्रावर परिणाम होतो. हा शोध नेचर क्लायमेेट चेंजमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधकांनी 10 हजारहून अधिक मुलांवर यात संशोधन केले. यात 2581 गर्भातील मुलांचाही प्राधान्याने समावेश आहे.

उष्णतेचा मुलांच्या मेंदूवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन हाती घेण्यात आले होते. यासाठी गर्भावस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत विविध वयोगटात त्यांच्या-त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी तापमान किती असते, याचा अभ्यास करण्यात आला. त्याचप्रमाणे त्या मुलांची मानसिक स्थिती तपासली गेली व त्यानुसार निष्कर्ष जाहीर केले गेले.

जन्मानंतर काही दिवस व त्यापूर्वी गर्भावस्थेत अपत्ये उष्णतेबाबत अधिक संवेदनशील असतात. उष्णता वाढल्याने स्वास्थ व मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे, चिंता वाढते, स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. यामुळे, अगदी शिक्षणावर देखील परिणाम होऊ शकतो, असेही या अभ्यासात आढळून आले. यावर एकच उपाय असा आहे, तो म्हणजे तापमान कमी करणे, असे संशोधकांनी यात नमूद केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT