बीजिंग : मध्य चीनमधील हेनान प्रांतात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मानवी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. सुमारे 1,60,000 वर्षांपूर्वीचे आदिमानव प्रगत दगडी हत्यारे वापरत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. या शोधामुळे ‘आशियातील पाषाणयुगीन तंत्रज्ञान युरोप आणि आफ्रिकेच्या तुलनेत मागे होते,’ या जुन्या समजाला मोठे आव्हान मिळाले आहे.
2017 मध्ये शोध लागलेल्या ‘शिगौ’ या ठिकाणी उत्खननादरम्यान 2,600 पेक्षा जास्त दगडी हत्यारे सापडली आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार :
जोड-हत्यारे : शास्त्रज्ञांना प्रथमच अशी हत्यारे सापडली आहेत, जी लाकडाच्या किंवा अन्य कोणत्याही दांड्याला जोडलेली होती. पूर्व आशियातील ‘संयुक्त हत्यारांचा’ हा सर्वात जुना पुरावा मानला जात आहे.
नियोजन आणि कौशल्य : ही हत्यारे बनवण्याची पद्धत अत्यंत प्रगत होती. ती तयार करण्यासाठी अनेक मधल्या पायर्यांचा वापर केला गेला, ज्यातून त्या काळातील मानवाचे ‘नियोजन आणि दूरद़ृष्टी’ दिसून येते. ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या ऑस्ट्रेलियन रिसर्च सेंटर फॉर ह्युमन इव्होल्युशनचे संचालक मायकेल पेट्राग्लिया यांनी सांगितले की, ‘दगडाला दांडा जोडल्यामुळे हत्याराची ताकद आणि कार्यक्षमता वाढली होती. सूक्ष्म तपासणीत असे दिसून आले आहे की, या हत्यारांचा वापर वनस्पती, लाकूड किंवा बोरू कापण्यासाठी किंवा त्यांना छिद्र पाडण्यासाठी केला जात असावा. ‘ही हत्यारे कोणत्या मानवी प्रजातीने बनवली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्राध्यापक बेन मारविक यांच्या मते, त्या काळात या प्रदेशात ‘डेनिसोव्हन्स’, ‘होमो लाँगी’, ‘होमो जुलुएन्सिस’ किंवा ‘होमो सेपियन्स’ यांसारख्या विविध मानवी प्रजाती अस्तित्वात होत्या. भविष्यात सापडणारे जीवाश्म किंवा डीएनए चाचण्या या रहस्यावरून पडदा उचलू शकतील. पूर्व आशियात 3,00,000 वर्षांपूर्वीची लाकडी हत्यारे आधीच सापडली होती. परंतु, दोन वेगळ्या वस्तूंना जोडून बनवलेले हे पहिलेच प्रगत तंत्रज्ञान समोर आले आहे. हा शोध सिद्ध करतो की, प्राचीन आशियाई मानवी संस्कृती तांत्रिकद़ृष्ट्या खूप प्रगत होती.