Mars shortcut route | अपघातानेच सापडला मंगळावर जाण्याचा ‘शॉर्टकट’ मार्ग! 
विश्वसंचार

Mars shortcut route | अपघातानेच सापडला मंगळावर जाण्याचा ‘शॉर्टकट’ मार्ग!

पुढारी वृत्तसेवा

रिओ डी जानेरिओ : मंगळ ग्रहावर जाणे आणि परत येणे हे मानवासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान राहिले आहे. मात्र, एका शास्त्रज्ञाने चुकून अशा एका मार्गाचा शोध लावला आहे, ज्यामुळे भविष्यात अंतराळवीर वर्षभरापेक्षाही कमी कालावधीत मंगळाची सफर करून परत येऊ शकतील. या शोधामुळे सध्याच्या मोहिमेचा कालावधी थेट निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.

‘अ‍ॅक्टा अ‍ॅस्ट्रोनॉटिका’ या शोधपत्रिकेत एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानानुसार, पृथ्वीपासून मंगळावर पोहोचण्यासाठी सात ते 10 महिने लागतात. परंतु, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह इंधन बचतीच्या द़ृष्टीने दर 26 महिन्यांनी एका विशिष्ट रेषेत येतात. त्यामुळे अंतराळवीरांना परतीच्या प्रवासासाठी बराच काळ मंगळावरच वाट पाहावी लागते. परिणामी, संपूर्ण मोहिमेला जवळजवळ तीन वर्षे लागतात. ब्राझीलमधील ‘स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न रिओ डी जानेरो’ येथील विश्वशास्त्रज्ञ मार्सेलो डी ऑलिव्हेरा सौझा यांच्या संशोधनानुसार, ही वेळ आता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

सौझा यांनी सांगितले की, 2015 मध्ये ते पृथ्वीच्या जवळ असलेल्या लघुग्रहांचा अभ्यास करत असताना त्यांना ही कल्पना सुचली. ‘2001 उअ21’ नावाच्या एका विशिष्ट लघुग्रहाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. या लघुग्रहाच्या सुरुवातीच्या कक्षांच्या अंदाजावरून असे दिसून आले की, तो पृथ्वी आणि मंगळ या दोघांच्याही कक्षेतून जाणारा एक दुर्मीळ मार्ग पार करतो. सौझा म्हणतात, ‘मी मुद्दाम हे शोधायला गेलो नव्हतो; पण हे माझ्यासाठी एक आश्चर्य होते.’ लघुग्रहांच्या या मार्गाचा बारकाईने अभ्यास केल्यास पृथ्वी आणि मंगळ यांच्यात ‘अतिलहान’ मार्ग तयार करता येणे शक्य आहे, असे त्यांच्या निरीक्षणात आले.

या नवीन भौमितिक मार्गांमुळे मंगळ मोहिमेसाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागतो, हा जुना समज मोडीत निघू शकतो. जर या ‘शॉर्टकट’ मार्गांचा वापर केला, तर अंतराळवीर एका वर्षाच्या आत मंगळावर जाऊन सुखरूप परत येऊ शकतील. ‘कदाचित यामुळे आपली मंगळ मोहिमेची संकल्पनाच बदलून जाईल,’ असे सौझा यांनी सांगितले. या शोधामुळे भविष्यातील आंतरग्रहीय प्रवासासाठी नवीन दारे उघडली गेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT