दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबीतील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराने ‘द फेरी टेल’ या क्रांतिकारी इमर्सिव शोसाठी 2025 चे प्रतिष्ठित ‘मोंडो-डीआर’ (MONDO-DR) पारितोषिक जिंकून इतिहास घडवला आहे. AV (ऑडिओ-व्हिज्युअल) क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखले जाणारे हे पारितोषिक आध्यात्मिक नवकल्पना, जागतिक मान्यता आणि तंत्रज्ञान व परंपरेच्या अद्वितीय संयोगासाठी देण्यात येते.
MONDO-DR मासिकाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पारितोषिक AV उद्योगातील उत्कृष्टतेचे शिखर मानले जाते. मनोरंजन, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतील तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि भावनिक प्रभाव असलेल्या प्रकल्पांना हे पारितोषिक दिले जाते. 2025 मध्ये हाऊस ऑफ वर्शिप श्रेणीत जागतिक स्तरावर अनेक प्रतिष्ठित कॅथेड्रल्स, मशिदी आणि सिनेगॉग्स यांचे जबरदस्त स्पर्धक प्रकल्प होते. मात्र त्यातही बीएपीएस हिंदू मंदिराने बाजी मारत, आध्यात्मिक स्थळांमध्ये इमर्सिव AV डिझाईनसाठी नवीन मापदंड निर्माण केला आणि ते पारितोषक जिंकले.
‘द फेरी टेल’ हा केवळ एक दृश्यप्रयोग नाही, तर एक भावनिक यात्रा आहे. यात अद्ययावत सराऊंड साऊंड, 20 समक्रमित प्रोजेक्टर (synchronized projectors) आणि प्रभावी कथाकथन यांचा संगम आहे. बीएपीएसचे साधू, स्वयंसेवक आणि जगप्रसिद्ध AV सल्लागारांनी मिळून हा शो साकारला. प्रमुख स्वामी महाराजांचे शारजाहमधील प्रार्थनासत्र, शेख मोहम्मद बिन झायेद यांची उदारता, तसेच महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला भव्य उद्घाटन समारंभ असे यात प्रमुख क्षण जिवंत होतात.