विश्वसंचार

घर दुरुस्तीवेळी सापडला सात कोटींचा खजिना

Arun Patil

लंडन : घराची दुरुस्ती करताना एका ब्रिटिश दाम्पत्याला किचनमधील फरशीखाली सोन्याची तब्बल 263 नाणी सापडली. यातील बहुतेक नाणी सुमारे 300 हून अधिक वर्षांपूर्वीची होती. या दाम्पत्याने नुकताच या नाण्यांचा लिलाव केला, त्यातून त्यांना सात कोटी रुपये मिळाले. अशा रितीने एका झटक्यात हे दाम्पत्य कोट्यधीश झाले.

ब्रिटनमधील यॉर्कशायरच्या एलरबी गावात राहणार्‍या दाम्पत्याला तीन वर्षांपूर्वी घराची दुरुस्ती करताना किचनच्या फरशीखाली सोन्याची नाणी सापडली. ही नाणी किंग जेम्स प्रथम यांच्या शासन काळातील होती. दाम्पत्याने नुकताच या नाण्यांचा लिलाव केला. यामध्ये नाणी सुमारे 6 कोटी 92 लाख रुपयांना विकली गेली.

'डेली मेल'ने दिलेल्या माहितीनुसार जोसेफ फर्नले आणि त्याची पत्नी सारा मॅस्टर हे आपल्या 18 व्या शतकातील घराची तीन वर्षांपूर्वी दुरुस्ती करत होते. त्यावेळी त्यांना किचन फरशीखाली सोन्याची नाणी मिळाली. फर्नले कुटुंब लाकूड आणि कोळशाचा व्यापार करते. याशिवाय कुटुंबातील एक जण संसद सदस्यही बनला होता. फर्नले व मॅस्टर दाम्पत्याने या नाण्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये करण्यात आलेल्या लिलावात सर्व नाणी सुमारे सात कोटींना विकली गेली. इतकी मोठी रक्कम मिळेल, अशी या दाम्पत्याला कल्पनाही नव्हती. तज्ज्ञांच्या मते, ही नाणी अत्यंत दुर्मीळ आणि जुनी असल्यानेच इतकी मोठी रक्कम मिळाली.

SCROLL FOR NEXT