वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेचा तारा म्हणजे सूर्य. आपल्या या सूर्याचे भावंड असलेला एक महाकाय तारा वैज्ञानिकांनी शोधलेला असून तो ज्या धूळ व वायूच्या मिश्रणातून आपला सूर्य जन्मला तेथेच जन्मला आहे. सूर्याचे भावंड असलेल्या या तार्याचे नाव एचडी 162826 असे असून हा तारा सूर्यापेक्षा 15 पट जास्त वस्तुमानाचा आहे व तो शौरी तारकापुंजात आहे.
ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाचे इव्हान रामीरेझ यांच्या मते सूर्याची इतर भावंडेही अशाच प्रकारे शोधता येतील व त्यामुळे आपला सूर्य कसा व कुठे तयार झाला तसेच सौरमाला जीवसृष्टीस पोषक कशी बनली या प्रश्नांची उत्तरे देता येतील. रामीरेझ यांनी सांगितले की, आपण कुठे जन्मलो, दीर्घिकेच्या कुठल्या भागात आपण जन्मलो हे समजून घेता येईल.
त्या वेळच्या सौरमालेचे सादृश्यीकरण करणे शक्य आहे. या सूर्याची भावंडं असलेल्या तार्यांभोवती पृथ्वीसारखे जीवसृष्टी शक्य असलेले ग्रह असू शकतात. सुरुवातीच्या अवस्थेत काही ग्रहांची एकमेकांशी टक्कर होऊन त्यांचे तुकडे झाले व त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली, असे त्यांनी सांगितले. नवीन तारा हा नुसत्या डोळ्यांना दिसत नाही, तो द्विनेत्रीतून दिसतो व व्हेगा तार्यापासून फार दूर नाही. संशोधकांनी मॅक्डनॉल्ड वेधशाळेतील हारलान जे. स्मिथ दुर्बिणीतून अशा 23 तार्यांचा अभ्यास केला. चिलीतील लास कॅम्पनास वेधशाळेतील क्ले मॅगलन दुर्बिणीच्या मदतीने काही तार्यांचा अभ्यास करण्यात आला. तार्यांच्या कक्षा व रासायनिक रचना बघून एचडी 162826 हा तारा शोधण्यात आला. या तार्याभोवती गुरूसारखे मोठे ग्रह असण्याची शक्यता कमी आहे. लहान ग्रह असण्याची मात्र शक्यता आहे. ‘अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे.