न्यूयॉर्क : एखाद्या कडधान्याला मोड यावेत तशा पद्धतीने चक्क एका कोळ्याच्या शरीरातून बुरशी उगवल्याचे आढळून आले आहे. ही परजीवी बुरशी एका मोठ्या आकाराच्या कोळ्याच्या शरीरातून उगवल्याचे धक्कादायकरीत्या संशोधकांना आढळले. या परजीवीने कोळ्याचा जगण्याच्या संघर्षात पराभव करून त्याच्या शरीराचा ताबा घेतला आणि आपली अशी वाढ केली! त्याची पाठ, पाय आणि डोक्यातूनही या बुरशीचे असे कोंब फुटले आहेत.
या छायाचित्राने अनेक संशोधकांनाही थक्क केले. 'बीएमसी इकॉलॉजी अँड इव्होल्यूशन फोटोग्राफी' स्पर्धेतही हे छायाचित्र समाविष्ट होते व त्याने बक्षीसही जिंकले. इवोल्युशनरी बायोलॉजिस्ट रॉबर्टो गार्सिया-रोआ यांनी हे छायाचित्र टिपले आहे. त्यांचे हे छायाचित्र 'प्लँटस् अँड फंगी' विभागात उपविजेते ठरले.
त्यांनी सांगितले की एखाद्या परजीवी 'झोम्बी' बुरशीने कीटकावर आक्रमण करणे ही काही निसर्गातील नवी नवलाई नाही. मात्र, मोठ्या आकाराच्या कोळ्याच्याही शरीराचा असा ताबा मिळवून वाढलेली ही बुरशी धक्कादायकच आहे. जंगलात एका झर्याशेजारी पडलेल्या झाडावर हे द़ृश्य दिसून आले. या छायाचित्रातील कोळ्याच्या तसेच बुरशीच्या प्रजातीची माहिती मिळालेली नाही. मात्र, या बुरशीने आधी कोळ्याच्या शरीरात प्रवेश करून नंतर त्याचा ताबा मिळवल्याचे दिसून येते.