बँकॉक : आपल्याकडे हरियाणातील युवराज, सुल्तान यासारखे मुर्रा जातीचे अनेक रेडे देशभर प्रसिद्ध आहेत. मात्र, थायलंडमधील एक रेडा (वॉटर बफेलो) त्यांनाही मागे टाकेल असा आहे. थायलंडच्या निनलानी फार्म येथे असलेला हा तीन वर्षांचा रेडा ‘किंग काँग’ म्हणून ओळखला जातो. खुरांपासून खांद्यापर्यंत त्याची उंची 6 फूट 0.8 इंच आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, तो सामान्य प्रौढ म्हशीपेक्षा किंवा रेड्यापेक्षा सुमारे 20 इंच अधिक उंच आहे. ‘टॉलेस्ट लिव्हिंग वॉटर बफेलो’ म्हणून त्याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.
‘किंग काँग’ नाखोन रत्चासिमा येथील एका शेतात अन्य म्हशी व रेड्यांसमवेत असतो. आकाराने अवाढव्य असला तरी ‘किंग काँग’ अजिबात आक्रमक नाही. शांत स्वभावाच्या या रेड्याला पाण्यात खेळणे, स्वादिष्ट केळी खाणे आणि त्याची काळजी घेणार्या माणसांसोबत राहणे आवडते. त्याचा साधेपणा आणि मस्तीखोर स्वभाव त्याला खास बनवतो. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, ‘किंग काँग’ ची विक्रमी उंची शेतमालक सुचार्ट बूनचारोएनला त्याच्या जन्माच्या वेळीच जाणवली होती. त्याचा जन्म 1 एप्रिल 2021 रोजी झाला. त्याच्या भावी प्रचंड उंचीचा विचार करूनच त्याला ‘किंग काँग’ असे नाव देण्यात आले, जे एका प्रसिद्ध चित्रपटातील अवाढव्य गोरिलाचे आहे. किंग काँगचा जन्म झाला तेव्हा त्याची उंची इतर म्हशींपेक्षा जास्त दिसू लागली. तो फक्त तीन वर्षांचा आहे; पण त्याची उंची आणि शरीर खूप मोठे आहे. महाकाय असूनही किंग काँग आज्ञाधारक आहे. त्याला लोकांशी खेळायला आणि धावायला आवडते. तो शेतातील एखाद्या मोठ्या, मजबूत आणि मैत्रीपूर्ण रेडकासारखाच आहे.