उंटाच्या एका अश्रूत सापांचे विष निष्प्रभ करण्याची क्षमता Pudhari File Photo
विश्वसंचार

उंटाच्या एका अश्रूत सापांचे विष निष्प्रभ करण्याची क्षमता

सर्पदंशावरील उपचारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याची क्षमता असलेला एक नवीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण शोध समोर आला आहे. वाळवंटातील जहाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या उंटाच्या अश्रूंमध्ये तब्बल 26 प्रकारच्या सापांचे विष निष्प्रभ करण्याची अद्भुत क्षमता असल्याचे समोर आले आहे. बिकानेर येथील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्राने (NRCC) केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला असून, यामुळे सर्पदंशावरील उपचारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

‘एनआरसीसी’च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे आढळले की, उंटाच्या अश्रूंमध्ये विशिष्ट प्रकारचे अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) असतात, जे सापाच्या विषाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करू शकतात. संशोधकांनी ‘सॉ-स्केल्ड वायपर’ (फुरसे) या अत्यंत विषारी सापाच्या विषावर उंटाच्या अश्रूंचा यशस्वी प्रयोग केला आहे. या सापाच्या दंशानंतर माणसाचा जीव वाचवणे अत्यंत कठीण मानले जाते. मात्र, उंटाच्या अश्रूंमधून काढलेल्या अँटिबॉडीजने या विषावर यशस्वीपणे मात केली.

यापूर्वी लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन आणि दुबईच्या सेंट्रल व्हेटर्नरी रिसर्च लॅबोरेटरीनेही उंटाच्या अश्रूंच्या या अद्भुत क्षमतेवर प्रकाश टाकला होता. तज्ज्ञांच्या मते, उंटाच्या अश्रूंची किंमत जास्त असण्यामागे हेच कारण आहे. या अश्रूंमध्ये ‘लायसोझाइम’ नावाचे एन्झाइम असते, जे नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून काम करते. हेच प्रथिने आणि एन्झाइम उंटाला वाळवंटातील प्रतिकूल परिस्थितीत विविध संक्रमणांपासून वाचवतात.

या शोधामुळे भारतासारख्या देशांना मोठा दिलासा मिळू शकतो, जिथे दरवर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात. सध्या उपलब्ध असलेल्या सर्प प्रतिबंधक लसी काहीवेळा प्रभावी ठरत नाहीत किंवा त्यांच्यामुळे रुग्णाला इतर शारीरिक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, उंटाच्या अश्रूंपासून बनवलेली औषधे अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकतात. या संशोधनामुळे सर्पदंशावर अधिक प्रभावी आणि सहज उपलब्ध होणारी औषधे बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे भविष्यात लाखो लोकांचे प्राण वाचू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT