लंडन : जगातील अनेक शोध हे अपघातानेच लागलेले आहेत. इजिप्तमध्ये उत्खननात प्राचीन काळातील मूर्ती, कलाकृती किंवा अन्य वस्तू सापडणे ही काही नवलाईची बाब नाही. मात्र, स्कॉटलंडमध्ये तब्बल 4 हजार वर्षांपूर्वीची इजिप्शियन मूर्ती उत्खननात सापडली होती. सन 1952 मध्ये एका शाळकरी स्कॉटिश मुलाला जमिनीत बटाटे शोधत असताना ही मूर्ती सापडली होती! विशेष म्हणजे हे बटाटे शोधण्याची त्याला शिक्षा देण्यात आली होती. या शोधानंतर तिथे अन्यही अनेक इजिप्शियन कलाकृती सापडल्या. आता अशा प्राचीन इजिप्तमधील कलाकृती तिथे कुठून आल्या याबाबत नवे संशोधन करण्यात आले असून याबाबतचा खुलासा संशोधकांनी केला आहे.
ही मूर्ती सापडल्यानंतर या शाळेच्या आवारातील जमिनीत अशा अनेक इजिप्शियन वस्तू सापडल्या. 1952 ते 1984 या काळात फिफे कौंटीतील मेलविले हाऊसमधील जमिनीत अशा अनेक वस्तू सापडल्या. याच ठिकाणी दुसर्या महायुद्धाच्या काळात सैनिकांचा तळ होता. त्यानंतर या इमारतीचा वापर बोर्डिंग स्कूलसाठी होऊ लागला. याठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अनेक वेळा अशा प्राचीन कलाकृती सापडत होत्या. त्या शाळेच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या.
स्कॉटलंडच्या नॅशनल म्युझियम्समधील मुख्य क्युरेटर मार्गारेट मेटलँड यांनी सांगितले की हा एक अनोखा संग्रह आहे. याठिकाणी अशा वस्तू कुठून आल्या यांचे रहस्य त्यांच्याभोवती आहे. याच संग्रहात लाल वालुकाश्मात कोरलेल्या मूर्तीचे डोके आहे. ही मूर्ती तब्बल चार हजार वर्षांपूर्वीची आहे. प्राचीन इजिप्शियन कला संस्कृतीमधील हा 'मास्टरपीस' म्हणता येईल. याशिवाय ब्राॅंझ आणि सिरॅमिकच्या अनेक वस्तू याठिकाणी सापडल्या ज्या इसवी सन पूर्व 1069 ते इसवी सन पूर्व 30 म्हणजेच रोमन सत्ता इजिप्तवर येण्याच्या काही काळ आधीच्या युगातील आहेत. याठिकाणी एकूण 18 वस्तू सापडलेल्या आहेत.
या वस्तू इथे कशा आल्या व त्या जमिनीत का पुरल्या गेल्या याबाबत नवे संशोधन करण्यात आले आहे. या वस्तू तिथे लॉर्ड अलेक्झांडर लेस्ली-मेलविले यांनी आणल्या होत्या. त्यांना लॉर्ड बॅल्गोनी असेही म्हटले जाते. त्यांनी सन 1856 मध्ये इजिप्तचा प्रवास केला होता. इंग्लंडमध्ये परतल्यावर एक वर्षानंतर त्यांचे निधन झाले. इजिप्तमधून त्यांनीच या कलाकृती आणल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर वारसदारांनी या वस्तू ज्या इमारतीत ठेवल्या ती नंतर कोसळली व या वस्तूंविषयी त्यांचे नातेवाईक विसरून गेले.