आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट तयार केला आहे जो रेल्वे अपघात रोखण्यात मदत करू शकतो. Pudhari File Photo
विश्वसंचार

रेल्वे अपघात रोखू शकणारा रोबोट

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई : सध्याचा जमाना नॅनो टेक्नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन आणि अर्थातच रोबोट्सचा आहे. जपान-अमेरिकेसारख्या देशांमध्ये हरेक नमुन्याचे रोबोट बनलेले आहेत. आपल्या देशातही अनेक प्रकारचे रोबोट बनत असतात. अगदी अभियांत्रिकीचे विद्यार्थीही असे रोबोट बनवतात. अशाच काही विद्यार्थ्यांनी रेल्वे अपघात रोखू शकणाराही रोबोट बनवलेला आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?

रेल्वे अपघातांसाठी असलेल्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे रेल्वे ट्रॅकला गेलेले तडे. रेल्वे ट्रॅकला तडे गेलेले नाहीत का, हे पाहण्याची तसेच त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी गँगमनची असते. गँगमन नेहमी ट्रॅकची पाहणी करत असतात. पण, हे काम अनेकदा गँगमनच्या जीवावर बेततं. अनेकदा रेल्वे ट्रॅकची पाहणी करताना अपघात होऊन गँगमन जखमी होतात, तसेच मृत्युमुखीही पडतात. एका आकडेवारीनुसार, वेगवेगळ्या अपघातांमध्ये वर्षाला जवळपास 400 गँगमनचा मृत्यू होतो. यामधील अनेकांचा ट्रेनने धडक दिल्याने मृत्यू झालेला आहे. मात्र, आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटमुळे अनेक कामगारांचा जीव वाचू शकतो, तसेच प्रवासीही सुरक्षित प्रवास करू शकतात. आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट तयार केला आहे जो रेल्वे अपघात रोखण्यात मदत करू शकतो. हा रोबोट रेल्वे ट्रॅकसोबत जोडण्यात येईल. हा रोबोट सेन्सरच्या साहाय्याने 2 सेंमीपर्यंतच्या तड्याची माहिती देऊ शकतो. तसंच हा रोबोट रिअल टाईम डेटा देणार आहे. या रोबोटमुळे गँगमनला दरवेळी ट्रॅकवर उतरून तडे गेले आहेत की नाही, याची पाहणी करावी लागणार नाही. 1.5 फूट उंचीच्या या रोबोटला सहा चाकं असतील. हा रोबोट पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूने प्रवास करू शकतो. डेटा गोळा करण्यासाठी रोबोटमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर असणार आहे. रोबोटमधील मायक्रोचिपमध्ये हा डेटा गोळा होईल. जर रुळाला तडा असेल तर मायक्रोचिप लोकेशन आणि अलर्ट पाठवणार. रोबोट वजनाला अत्यंत हलका असणार असून, ट्रेन रुळावरून धावत असतानाही तो हालचाल करू शकतो. रेल्वेसाठी हा अत्यंत स्वस्त उपाय असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. रोबोट डेटा पाठवू शकेल, यासाठी सेंट्रल डेटाबेस तयार करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT