वॉशिंग्टन : अमेरिकेत लुइसियानामध्ये दुर्लभ गुलाबी डॉल्फिन समुद्रात दिसून आला. थर्मन गस्टीन नावाचा मच्छीमार मासेमारी करण्यासाठी गेला असता त्याला असा डॉल्फिन दिसला व त्याने कॅमेर्यात या डॉल्फिनला टिपून घेतले. त्याने सांगितले की गेल्या वीसपेक्षाही अधिक वर्षे आपण मासेमारी करीत आहोत; पण असा डॉल्फिन कधी पाहिला नव्हता. मेक्सिकोच्या खाडीजवळ कॅमरून पॅरिशमध्ये हा गुलाबी डॉल्फिन दिसला.
या परिसरात अनेक वेळा डॉल्फिन दिसत असतात, मात्र असा दुर्लभ गुलाबी रंगाचा डॉल्फिन प्रथमच दिसून आला. थर्मनने सांगितले, मी नेहमीच मासेमारी करण्यासाठी जात असतो. यावर्षीची ही लुइसियानाची माझी तिसरी ट्रिप होती. अशावेळी हा डॉल्फिन दिसून आला व त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. ज्या डॉल्फिनला त्याने पाहिले ती कदाचित 'पिंकी' नावाची मादी डॉल्फिन असावी जी दक्षिण लुइसियानातील एक प्रसिद्ध डॉल्फिन आहे.
पिंकीला सर्वप्रथम 2007 मध्ये कलासीयू नदीत पाहण्यात आले होते. तिचा रंग गुलाबी दिसत असला तरी ती एक अल्बिनो म्हणजे सफेद डॉल्फिन आहे. अशा अल्बिनो प्राण्यांमध्ये मेलानिन पिग्मेंटस् म्हणजे रंगद्रव्याचा अभाव असतो. पिंकीचे डोळे लाल असून शरीर त्वचेखालील रक्तवाहिन्यांमुळे गुलाबी दिसते.