पाटणा ः बिहारची राजधानी पाटणा येथील एम्समध्ये डॉक्टरांनी पंधरा वर्षे वयाच्या एका मुलीच्या पोटातून तब्बल नऊ किलो वजनाचा ट्यूमर शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. बिहारच्या सीतामढी येथील ही मुलगी अनेक वर्षांपासून पोटदुखीने त्रस्त होती. तिला पाटणा एम्समध्ये आणल्यावर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला.
या मुलीची स्थिती गंभीर होती व त्यामुळे तिच्यावरील ही शस्त्रक्रियाही सोपी नव्हती. मात्र, आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून 9.5 किलो वजनाचा हा ट्यूमर तिच्या पोटातून बाहेर काढला गेला. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस तिला आयसीयूमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले. पाटणा एम्स ट्रॉमा अँड इमर्जन्सीचे प्रमुख डॉ. अनिल कुमार यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की मुलीची प्रकृती गंभीर होती; पण तिच्या नातेवाईकांनी धैर्य धरून शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले व डॉक्टरांचीही उमेद वाढवली. आता या मुलीची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे. जर एखाद्या व्यक्तीला पोटात गाठ जाणवत असेल आणि पोटदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच अल्ट्रासाऊंड करून डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह ठरते असेही त्यांनी सांगितले.