मॉस्को : पश्चिम रशियामधील एका नदीच्या काठी आठ वर्षांच्या मुलीला तब्बल 1 लाख वर्षांपूर्वीच्या मॅमथ हत्तीचा दात सापडला. ही मुलगी आपल्या वडिलांसमवेत मासेमारी करण्यासाठी आली होती. त्यावेळी या दातासह मॅमथच्या पायाची हाडेही तिला सापडली.
नोविंकीजवळील ओका नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी ही मुलगी आली होती. त्यावेळी तिला मॅमथच्या मणक्याचे हाड तसेच एक दात आढळून आला. या मुलीचे नाव मरियम मिर्सेतोवा असे आहे. तिला तिथे अनेक विचित्र गोष्टी दिसून आल्या. या नदीच्या काठी अलीकडेच दरड कोसळली होती. त्यामधून या वस्तू बाहेर आल्या होत्या. तिने या वस्तू आपल्या वडिलांना दाखवल्या असता ती हाडे व हत्तीचा दात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही हाडे व दाताचे फोटो काढून ते जवळच्या निझनी नोवगोरोड म्युझियमच्या तज्ज्ञांकडे पाठवले. त्यावेळी हे वुली मॅमथ म्हणजेच प्रागैतिहासिक काळातील केसाळ हत्तींचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. या हत्तीची हाडे तुलनेेन अधिक संरक्षित होती. या हाडांवरून स्पष्ट झाले की ती एका पूर्ण वाढ झालेल्या मॅमथची आहेत. हा मॅमथ तब्बल एक लाख वर्षांपूर्वी तिथे वावरत होता.