युबारी : एखादं फळ महाग म्हटलं, तर त्याची किंमत किती असेल 100 रुपये, 500 रुपये, काही हजार रुपये; पण एक असं फळ ज्याची किंमत सोन्याइतकीच आहे. या फळाची किंमत इतकी आहे की, जगातील उच्च मध्यमवर्गीय, अगदी श्रीमंतांनाही त्याचा आस्वाद घेताना दोनवेळा विचार करावा लागेल. या फळाची तुलना सोन्याशी केली जाते. कारण, एका फळाची एक किलोग्रॅमची किंमत जवळपास 20,000 रुपये आहे; पण एका फळाचे वजन सरासरी 2.5 ते 3 किलो असते. म्हणजे एका फळाची किंमत जवळपास 50 ते 60 हजार रुपये इतकी भरते.
जपानी परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, एकदा दोन फळांचा लिलाव 5 मिलियन येन म्हणजे 31.50 लाख रुपयांना झाला होता. सोन्याची याची तुलना केली, तर एक किलो सोनं 52 लाखांच्या आसपास आहे. या फळाचा आतील भाग नारंगी असतो; तर बाहेरील भाग हिरवा असतो. त्याच्या सालीवर पांढर्या रेषा असतात. याची चवही एकदम वेगळी असते. याच्या शेतीची खूप देखभाल करावी लागते. आता हे फळ कोणतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तर असणारच. जपानच्या होक्काइडो बेटावरील युबारी शहरात या फळाची शेती होते. हे शहर बेटाच्या मधोमध आहे. या फळाचे नाव आहे युबारी टरबूज. हे खास टरबूज आहे, ज्याला जगातील सगळ्या टरबुजांचा राजाही म्हटले जाते.