त्वचेला स्पर्श न करता हृदयविकाराचा धोका सांगणारे उपकरण. Pudhari File Photo
विश्वसंचार

त्वचेला स्पर्श न करता हृदयविकाराचा धोका सांगणारे उपकरण

पुढारी वृत्तसेवा

टोरांटो : जगभरात हृदयविकाराने ग्रस्त असलेले लोक अनेक आहेत. याबाबत वेळीच जागरूक झाले तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. कॅनडामधील संशोधकांनी याबाबतचे एक उपकरणही बनवलेले आहे. त्वचेला कोणताही स्पर्श न करता हृदयविकाराचा संभाव्य धोका सांगू शकणारे हे अनोखे उपकरण आहे. या उपकरणामध्ये कोडेड हेमोडायनामिक इमेजिंग ही पद्धती वापरण्यात आली आहे.

वेगवेगळ्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह कसा आहे, याचे निरीक्षण या उपकरणाच्या साह्याने केले जाऊ शकते. यासाठी संबंधित व्यक्तीच्या त्वचेला या उपकरणाचा स्पर्श होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीला कोणताही त्रास न होता, त्याच्या हृदयाशी संबंधित गोष्टींचे मोजमाप केले जाऊ शकते. नवजात अर्भकांना या उपकरणाचा मोठा लाभ होऊ शकतो. एनआयसीयूमध्ये असलेल्या अर्भकांच्या हृदयाच्या कार्याचे मोजमाप करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरू शकणार आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेला रक्तप्रवाह मोजण्याची क्षमता या उपकरणामध्ये असल्याचे कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठातील संशोधक रॉबर्ट अमेलार्ड यांनी सांगितले. शरीराच्या वेगवेगळ्या भागातील रक्तप्रवाहाचे निरीक्षण या उपकरणाच्या साह्याने करता येणार असल्यामुळे शरीरामध्ये नेमक्या काय हालचाली घडता आहेत, हे समजू शकणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT