विश्वसंचार

डार्विननंतर 190 वर्षांनी त्याच्या विश्वभ्रमंतीवर आधारित मोहीम!

Arun Patil

वॉशिंग्टन : जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत देणारा शास्त्रज्ञ म्हणजे चार्ल्स डार्विन. त्याने जगभर फिरून जीवांशी संबंधित अनेक नमुने गोळा केले होते आणि त्यामधूनच त्याच्या या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आकाराला आला होता. आता त्याच्या या विश्वभ्रमंतीचा माग काढण्यासाठी दोन वर्षांची खास जलमोहीम आखण्यात आली आहे.

या मोहिमेला 'डार्विन200' असे नाव देण्यात आले आहे. 15 ऑगस्टला ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. इंग्लंडच्या प्लायमाऊथ येथून संशोधकांचे एक आंतरराष्ट्रीय पथक या मोहिमेसाठी रवाना झाले. 'उस्टरशेल्ड' नावाच्या उंच डच जहाजातून ही टीम प्रवास करीत आहे. ते 74 हजार किलोमीटरचा प्रवास करतील व चार खंडांमधील 32 वेगवेगळ्या बंदरांवर नांगर टाकतील. इंग्लंडच्या फॉलमाऊथ येथे त्यांचा हा प्रवास पूर्ण होईल. ते या प्रवासात वैज्ञानिक डाटा गोळा करतील तसेच भविष्यातील पर्यावरणवाद्यांना प्रशिक्षित करून पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाला उत्तेजन देतील.

त्यांचा हा प्रवास जवळजवळ डार्विनच्या 'एचएमएस बिगल' या जहाजाच्या मार्गानेच असेल. हे जहाज 27 डिसेंबर 1831 मध्ये प्लायमाऊथमधून रवाना झाले होते. ते 2 ऑक्टोबर 1836 मध्ये फॉलमाऊथला परतले होते. डार्विन या प्रवासाला गेला त्यावेळी त्याचे वय 22 वर्षे होते. जग पाहण्याच्या इच्छेने त्याने हा प्रवास सुरू केला होता. मात्र, या प्रवासात जीवांचे प्रचंड वैविध्य पाहून त्याला याबाबतच्या संशोधनाची प्रेरणा मिळाली. नैसर्गिक निवडीतून जीवांची उत्क्रांती घडते, असा सिद्धांत त्याने यानंतर मांडला.

SCROLL FOR NEXT