जयपूर : गायीला पहिली भाकर देण्याची परंपरा गावखेड्यात अजूनही सुरू आहे. कारण गायीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. राजस्थानचे एक उद्योगपती नरेंद्र राजपुरोहित यांनी तर त्यांच्या राधा नावाच्या गायीसाठी चक्क एक कोटीचा बंगला बांधण्याचे काम सुरू केलेले आहे. हा दोन मजली बंगला असणार आहे. या बंगल्यात संगमरवरची लादी असणार आहे. आकर्षक डिझाईन आणि प्रत्येक सुख सुविधांनी हा बंगला सज्ज असणार आहे. नरेंद्र राजपुरोहित यांच्या घरापेक्षा गायीचा बंगला सव्वा फूट उंच असणार आहे. या राधाच्या सेवेसाठी चार लोक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे या राधाची अख्ख्या राजस्थानमध्येच नव्हे तर देशात चर्चा आहे. विशेष म्हणजे, या गायीसाठी त्यांनी २४ लाखांचे दागिने बनवले आहेत.
राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील राणावाडा क्षेत्रातील धानोल गाव नेहमी चर्चेत असतं. या गावात राधा नावाच्या गायीसाठी ‘राधा महल’ नावाचा हा बंगला बनवण्यात येत आहे. नरेंद्र हे गौसेवक आहेत. मुंबईत त्यांचा बिझनेस आहे. रेल्वेत ते ठेकेदार आहेत. त्यांचा इलेक्ट्रिक स्कूटरचाही बिझनेस आहे. ते प्रेमाने या गायीला ‘राधा मैया’ म्हणून हाक मारतात. राधावर राजपुरोहित कुटुंबाचं एवढं प्रेम आहे की, रोज सकाळ संध्याकाळी राधाची आरती केली जाते. तिला देशी तुपातील लाडू खायला दिले जातात. राधा गाय १० किलोचे चांदीचे दागिने घालते. राधा दोन वर्षाची असताना राजपुरोहित हे तिला पथमेडा गौशालेतून घेऊन आले होते. चांगला बँडबाजा वाजवत तिची मिरवणूक काढत आणलं होतं.
२०१५ ची ही गोष्ट. राधा त्यांच्या घरी येताच त्यांचं नशीब पालटलं. १५०० रुपयांची नोकरी करणाऱ्या राजपुरोहित यांचा बिझनेस वाढला. त्यामुळे ते राधा भक्त झाले. ते मुंबईत ठेकेदारी करतात. राधाचं दर्शन केल्याशिवाय संपूर्ण कुटुंब जेवण करत नाही. नरेंद्र जेव्हा मुंबईत असतात तेव्हा सीसीटीव्हीतून दिवसातून अनेकदा राधाचं दर्शन घेतात. महिन्यातून चार वेळा गावाला जातात आणि राधाची सेवा करतात. नरेंद्र यांच्याकडे एकूण २५ गायी आहेत; पण राधा सर्वात खास आहे. राधा ही कांकरेज वंशाची गाय आहे. राधा घरी आल्यानंतर आपली भरभराट झाली असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक महिन्याची अष्टमी, धार्मिक कार्यक्रम आणि तीज सणाला तिला सजवलं जातं. तिच्या अंगावर सुमारे १० किलो दागिने असतात. गळ्यात कंठी, डोक्यावर चांदीचा दागिना आणि ओढणीने सजलेली राधा एकदम शाही वाटते. एकूण २४ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने तिच्या अंगावर असतात.