विश्वसंचार

तुर्कीत सापडला ९९ टन सोन्याचा खजिना

Pudhari News

अंकारा : संपूर्ण जगभरात सोन्याला अत्यंत मौल्यवान आणि महागडा धातू म्हणून ओळखले जाते. सध्या या धातूच्या जागतिक बाजारात विक्रमी उसळी घेतली आहे. सध्या 10 ग्रॅम सोने खरेदी करावयाचे झाले तरी किमान 50 हजार रुपये मोजावे लागतात. यामुळे हा पिवळा धातू गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचा बनला आहे. मात्र, हाच धातू महागाईशी संघर्ष करत असलेल्या तुर्कीला सावरू शकतो. कारण या देशात सुमारे 99 टन इतके सोने असलेला जणू खजिनाच मिळाला आहे. तुर्कीतील स्टेट न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार सोगूट शहरामध्ये ही सोन्याची खाण मिळाली आहे.

या खाणीतून सुमारे 99 टन सोने मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या किमतीनुसार या सोन्याची किंमत सुमारे 6 अब्ज डॉलर (4432 कोटी रुपये) होऊ शकतेे. सोगूट शहरातील अ‍ॅग्रीकल्चर क्रेडिट को ऑपरेटिव्ह आणि गुब्रेटस् खत उत्पादन कंपनी चालवणार्‍या फाहरेतीन पोयराज यांनी यासंबंची माहिती दिली आहे. सोगूट शहरातील खाणीत सुमारे 99 टनांहून अधिक सोने मिळण्याची शक्यता असून याची किंमत सुमारे 6 अब्ज डॉलर होईल. यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत मिळेल, असे पोयराज यांनी सांगितले. यानंतर गुब्रेटस्चे शेअर तब्बल 10 टक्यांनी वधारले. तर सप्टेंबरमध्ये आम्ही विक्रमी 38 टन सोन्याचे उत्पादन केल्याचे ऊर्जा आणि प्राकृतिक संसाधन मंत्री फेथ डॉनमेज यांनी सांगितले.

 

SCROLL FOR NEXT