विश्वसंचार

मोरोक्कोतील बीचवर आढळल्या 90 हजार वर्षांपूर्वीच्या मानवी पाऊलखुणा

Arun Patil

पॅरिस : मोरोक्कोमधील एका बीचवर प्राचीन मानवांच्या पाऊलखुणांचे दोन मार्ग आढळून आले आहेत. त्यापैकी एक जगातील सर्वात मोठ्या प्राचीन पाऊलखुणांच्या मार्गापैकी एक आहे. या पाऊलखुणा तब्बल 90 हजार वर्षांपूर्वीच्या आहेत.

उत्तर आफ्रिकेच्या टोकावर 2022 मध्येच संशोधकांना या पाऊलखुणांच्या जागेचा छडा लागला होता. तेथील जवळच्या बीचवरील विशिष्ट खडकांचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या या संशोधकांना त्याची माहिती मिळाली होती. याबाबतच्या संशोधनाची माहिती आता 'सायंटिफिक रिपोर्टस्' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. फ्रान्सच्या सदर्न ब्रिटनी युनिर्व्हसिटीतील कोस्टल डायनॅमिक्स अँड जिओमार्फोलॉजीचे प्राध्यापक माऊंसेफ सेद्राती यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की, खडकाचा अभ्यास करत असताना भरती आल्यावर मी माझ्या सहकार्‍यांनी आणखी उत्तरेकडे जाऊन अन्य एका बीचवर संशोधन करू, असे सुचवले.

त्याठिकाणी गेल्यावर आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. याठिकाणी अशा मानवी पाऊलखुणा आढळून आल्या. सुरुवातीला या पाऊलखुणाच आहेत याची आम्हाला खात्री नव्हती; मात्र अभ्यासाअंती समजले की हा एक ट्रॅकवे आहे. असा आणखी एक ट्रॅकवे ितिथे असल्याचेही दिसून आले. संशोधनातून स्पष्ट झाले की उत्तर आिफ्रिकेतील तसेच सदर्न मेडिटेरियन भागातील हा एकमेव ज्ञात ह्युमन ट्रॅकवे साईट आहे. या दोन ट्रॅकवेमध्ये एकूण 85 मानवी पाऊलखुणा आहेत. त्या किमान पाच मानवांच्या आहेत. तब्बल 90 हजार वर्षांपूर्वीच्या होमो सेपियन्स मानवाच्या या समुद्रकिनार्‍यावर उमटलेल्या या पाऊलखुणा आहेत.

या पाऊलखुणांच्या कालनिश्चिती व अन्य अभ्यासासाठी ऑप्टिकली स्टिम्युलेटेड ल्युमिनेसेन्स डेटिंग या तंत्राचा वापर करण्यात आला. त्यामध्ये तेथील काही विशिष्ट खनिजांचा तसेच क्वॉर्टझ्च्या कणांचा अभ्यास केला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT