90 year old super grandma fitness | 90 वर्षांच्या ‘सुपर आज्जी’ने उचलले तब्बल 45 किलो वजन 
विश्वसंचार

90 year old super grandma fitness | 90 वर्षांच्या ‘सुपर आज्जी’ने उचलले तब्बल 45 किलो वजन

पुढारी वृत्तसेवा

तैपेई : वय हे केवळ एक आकडा आहे, हे तैवानमधील चेंग चेन चिन-मेई या ९० वर्षीय आजींनी सिद्ध करून दाखवले आहे. तैपेईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका वेटलिफ्टिंग स्पर्धेत चेंग चेन यांनी चक्क ४५ किलो वजन उचलून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यांच्या या कामगिरीमुळे जिथे त्यांचे कौतुक होत आहे, तिथेच आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पार्किन्सनवर मात करण्यासाठी उचलले वजन

चेंग चेन यांना गेल्या वर्षी 'पार्किन्सन' या आजाराचे निदान झाले होते. आजारपणामुळे खचून न जाता, आपल्या नातीच्या आग्रहाखातर त्यांनी जिममध्ये जाऊन वजन उचलण्यास सुरुवात केली. केवळ एका वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या व्यायामामुळे त्यांच्या शरीराची ठेवण सुधारण्यास आणि खांदे हलके वाटण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील खास आकर्षण, विक्रमी कामगिरी

तीन फेऱ्यांच्या या स्पर्धेत त्यांनी 'हेक्स बार'चा वापर करून ४५ किलो वजन उचलले आणि आपला वैयक्तिक विक्रम मोडीत काढला. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या ही स्‍पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत्या. या स्पर्धेत ७० वर्षांवरील ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्‍यात चेंग चेन ९० वर्षांच्या होत्या, तर सर्वात ज्येष्ठ स्पर्धक ९२ वर्षांचे होते.

'सुपर-एज्ड' सोसायटीकडे तैवानची वाटचाल

तैवानमधील वाढत्या वृद्ध लोकसंख्येला लक्षात घेऊन तेथील सरकारने विशेष जिम आणि फिटनेस सेंटर्स सुरू केली आहेत. "वृद्धापकाळात स्नायूंची ताकद कमी होणे आणि पडल्यामुळे होणाऱ्या जखमा टाळण्यासाठी हेक्स-बार डेडलिफ्ट हा एक उत्तम व्यायाम आहे," असे प्रशिक्षक चेंग यू-शाओ यांनी सांगितले.

वृद्धांना दिला मोलाचा संदेश

स्पर्धेनंतर माध्‍यमांशी बोलताना चेंग चेन म्हणाल्या, "मला सर्व वृद्ध लोकांना सांगायचे आहे की, वर्कआउटमध्ये सहभागी व्हा. खूप कष्ट करण्याची गरज नाही, पण निरोगी राहण्यासाठी हे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT