Old Couple Marriage | 64 वर्षांच्या ‘लिव्ह इन’नंतर नव्वदीत चढली लग्नाची बेडी! 
विश्वसंचार

Old Couple Marriage | 64 वर्षांच्या ‘लिव्ह इन’नंतर नव्वदीत चढली लग्नाची बेडी!

पुढारी वृत्तसेवा

नैरोबी: जगात तुम्ही प्रेमाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या असतील, पण केनियामधून समोर आलेल्या एका प्रेमकहाणीने लोकांना थक्क करण्यासोबतच भावुकही केले आहे. येथील 95 वर्षांचे इब्राहिम बोम्बो यांनी अखेर आपली 90 वर्षांची प्रेमिका ताबिथा वांगुई हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या दोघांनी एकमेकांना 6 महिने किंवा 6 वर्षे नव्हे, तर तब्बल 64 वर्षे डेट केले! एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर या दोघांनी म्हातारपणात लग्न करून लोकांना खर्‍या प्रेमाचा अर्थ समजावून दिला आहे.

सोशल मीडियावर या अनोख्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. लग्नाच्या पोशाखात नटलेल्या या वयोवृद्ध नवरदेव आणि नवरीला पाहून लोक म्हणत आहेत की, ‘प्रेमाला वयाचे बंधन नसते.’ कोणी याला ‘शतकातील सर्वात मोठी लव्ह स्टोरी’ म्हणत आहे, तर कोणी ‘सच्च्या प्रतीक्षेचे फळ’ असे सांगत आहे. इब्राहिम आणि ताबिथा यांची पहिली भेट 1960 च्या दशकात झाली होती. त्या काळात दोघेही तरुण होते आणि पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. इब्राहिमने ताबिथाला लग्नासाठी विचारलेही, पण ताबिथाने लगेच होकार दिला नाही. नाते केवळ शब्दांवर चालत नाही, असे ताबिथाचे मत होते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तिला पूर्ण विश्वास हवा होता.

याच कारणामुळे तिने लग्नासाठी घाई केली नाही; परंतु या दोघांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. लग्नानंतर ताबिथाने प्रसारमाध्यमांशी बोलताना या विलंबामागचे रंजक कारण सांगितले. ती म्हणाली, ‘मला नेहमी असे वाटायचे की अनेक पुरुष काळासोबत बदलतात. इब्राहिम आयुष्यभर माझी साथ देईल की नाही, हे मला पाहायचे होते. माझे त्याच्यावर प्रेम नक्कीच होते, पण लग्नासाठी मला पूर्ण खात्री हवी होती. आता 64 वर्षांनंतर मला पूर्ण विश्वास झाला आहे की, हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत माझी साथ निभावेन.’ ताबिथाचा हा विचार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

या दोघांनी इतकी वर्षे लग्न न करता एकत्र आयुष्य घालवले, कुटुंब सांभाळले, मुलांचे संगोपन केले आणि प्रत्येक कठीण काळात एकमेकांना साथ दिली. मात्र, त्यांनी कायदेशीर आणि धार्मिक पद्धतीने लग्न केले नव्हते. अखेर त्यांनी चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी दोघेही जोडपे खूप आनंदी दिसत होते. या खास सोहळ्याला त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मुले आणि नातवंडेही उपस्थित होते. संपूर्ण गावात सणासारखे वातावरण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT