बार्सिलोना : ग्रीसमधील कॅलिप्सो डीप या समुद्री तळातील भागात जवळपास 16700 फूट खोलीवर संशोधकांना तेथील कचर्यातील तब्बल 88 टक्के भाग प्लास्टिकचा असल्याचे आढळून आले आहे. समुद्रातील सर्वात खोलवर असलेल्या काही ठिकाणांपैकी एक असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी संशोधकांनी बार्सिलोना विद्यापीठाच्या लिमिटिंग फॅक्टर नामक अत्याधुनिक पाणबुडीची मदत घेतली. इतक्या मोठ्या प्रमाणात समुद्राच्या तळाशी पोहोचलेला हा प्लास्टिक कचरा अर्थातच चिंतेचा विषय ठरतो आहे.
ही पाणबुडी जवळपास 43 मिनिटे समुद्राच्या तळाशी थांबवली गेली आणि यादरम्यान 650 मीटर्स अंतरापर्यंत चाचपणी केली. यात त्यांना प्लास्टिक कॅरीबॅग व जहाजातून फेकला गेलेला कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला. कॅलिप्सो डीप ही ग्रीसच्या पेलोपोनीज किनार्यापासन 60 किलोमीटर्स पश्चिमकडे स्थित भूमध्य समुद्रातील सर्वात खोल खाई असून त्याची खोली 5267 मीटर्सपर्यंत आहे. युरोपमधील सर्वात खोल बिंदू येथेच आढळून येतो. हे सर्व क्षेत्र भूकंपीय रुपाने सक्रिय आहे. यावर अभ्यास करणारे बार्सिलोना ओशन डायनेमिक्सचे डिपार्टमेंट हेड डॉ. मिकेनल कैनल्स यांनी आता दुर्दैवाने भूमध्य समुद्रातील एक इंच हिस्साही प्रदूषणमुक्त राहिला नसल्याचे निरीक्षण येथे नोंदवले.