नवी दिल्ली ः येथील सुमित गुप्ता या तरुणाने 11 सप्टेंबर ते 5 डिसेंबर 2009 या काळात एकूण 61,445 किलोमीटरचा प्रवास केला. हा प्रवास त्याने एक तर रेल्वेने किंवा सरकारी रोडवेजच्या बसने केला. प्रवास करीत असताना राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेससारख्या प्रीमियम रेल्वेंचा लाभ घेणे त्याने टाळले होते. आता या 86 दिवसांच्या प्रवासाने एक विश्वविक्रम केला असून, त्याची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे.
वडील व्यापारी असल्याने लहानपणापासूनच सुमितला प्रवासाची आवड आणि सवय आहे. तो सातवीत होता त्यावेळी त्याने गिनिज बुक पाहिले होते व आपणही एखादा विक्रम करावा असे त्याने मनोमन ठरवले होते. एका बँकेत त्याने क्लार्कची नोकरी पत्करली व आपले भारत भमणाचे स्वप्न पूर्ण करून गिनिज बुकमध्ये नाव नोंदवण्यासाठीही प्रयत्न सुरू केले. 11 सप्टेंबर 2009 मध्ये तो दिल्लीच्या सराय रोहिल्ला येथून भारत भमणासाठी बाहेर पडला. दिल्लीच्याच रेल्वे स्टेशनवर त्याने 5 डिसेंबर 2009 या दिवशी आपला प्रवास पूर्ण केला. या 86 दिवसांमध्ये त्याने 61,445 किलोमीटरचा प्रवास केला.
हा प्रवास करीत असताना त्याने गिनिज बुकच्या सर्व नियमांचे पालन केले. केवळ बस किंवा रेल्वेनेच प्रवास करणे, खासगी किंवा चार्टर्ड बसचा प्रवास टाळणे, प्रीमियम रेल्वेंचा प्रवास टाळणे आदी नियम त्याने पाळले. या प्रवासासाठी त्याने 63 मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेन तसेच 41 बसची सेवा घेतली. त्यानंतर त्याने गिनिज बुककडे विक्रमासाठी दावा केला. आता याच वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्याला विक्रमाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याने जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, पश्चिमेतील पोरबंदरपासून पूर्वेकडे न्यू तिनसुकियापर्यंत अशा संपूर्ण भारताचा चारवेळा प्रवास केला आणि हा विक्रम घडवला.