Joint Family | ८३ सदस्य, ६ पिढ्या अन्‌ एकच चूल!  
विश्वसंचार

Joint Family | ८३ सदस्य, ६ पिढ्या अन्‌ एकच चूल!

‘या’ एकत्र कुटुंबाची गोष्ट जिंकतेय लोकांची मने

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद : आजच्या काळात जिथे विभक्त कुटुंब पद्धतीकडे लोकांचा कल वाढत आहे, तिथे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक कुटुंब आपल्या अनोख्या जीवनशैलीमुळे देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. या कुटुंबात एक-दोन नाही, तर चक्क ८३ सदस्य एकत्र राहतात. सहा पिढ्यांपर्यंत पसरलेले हे ‘नागप्पा कुटुंब’ एकाच स्वयंपाकघरात जेवण बनवते, एकत्र कमवते आणि घरातील प्रत्येक लहान-मोठा निर्णय एकत्र मिळून घेते.

चार घरे; पण स्वयंपाकघर एकच

अनंतपूर जिल्ह्यातील कुरलपल्ली गावातील नागप्पा कुटुंब हे आजच्या समाजासाठी एक आदर्श बनले आहे. या कुटुंबात एकूण ८३ सदस्य असून, त्यात ६ सासू, १४ सुना, २० मुले आणि अनेक वृद्ध सदस्यांचा समावेश आहे. हे सर्वजण जरी चार वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असले, तरी त्यांची जीवनशैली पूर्णपणे एकाच कुटुंबासारखी आहे. संपूर्ण ८३ लोकांचे जेवण एकाच मोठ्या स्वयंपाकघरात तयार होते. सुना मिळून जेवण बनवतात आणि सर्वजण एकत्र बसून जेवतात.

रोज सकाळी होते ‘फॅमिली मीटिंग’

कुटुंबातील शिस्त आणि ताळमेळ टिकवून ठेवण्यासाठी या घरात रोज सकाळी एक खास बैठक होते. घरातील ज्येष्ठ सदस्य एकत्र चहा-कॉफी घेता घेता संपूर्ण दिवसाचे नियोजन करतात. शेतात कोण जाणार, घरची कामे कोण करणार आणि जेवणात काय बनणार, हे या बैठकीत ठरवले जाते. जबाबदाऱ्यांच्या योग्य वाटपामुळे कोणावरही कामाचा ताण येत नाही.

शेतीसोबतच ट्रान्सपोर्टचा व्यवसाय

या कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन केवळ शेती नाही, तर त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसायही आहे. कुटुंबाकडे चार बसेस आहेत, ज्या कल्याणदुर्गम ते कर्नाटक दरम्यान चालतात. शेती आणि व्यवसायातून मिळणारे सर्व उत्पन्न एकाच ठिकाणी जमा होते आणि गरजेनुसार ते खर्च केले जाते. म्हणजेच, येथे कोणीही स्वतःची वेगळी कमाई ठेवत नाही.

वाद एकाच दिवसात मिटवण्याचा नियम

एवढ्या मोठ्या कुटुंबात मतभेद होणे स्वाभाविक आहे; परंतु नागप्पा कुटुंबाचा एक नियम स्पष्ट आहे. कोणताही वाद दुसऱ्या दिवसापर्यंत जाता कामा नये. काही वाद झाल्यास, त्याच दिवशी सर्वजण एकत्र बसून त्यावर तोडगा काढतात. परस्परांबद्दलचा आदर, संयम आणि संवाद हेच या कुटुंबाच्या एकतेचे रहस्य आहे. सोशल मीडियावर या कुटुंबाची कहाणी प्रचंड व्हायरल होत असून, बदलते जग आणि आधुनिकतेच्या काळातही नागप्पा कुटुंबाने जपलेली ही परंपरा खरोखरच कौतुकास्पद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT