रेचल कौर  File Photo
विश्वसंचार

ऑफिसला जाण्यासाठी रोज 800 कि.मी.चा विमानप्रवास!

पुढारी वृत्तसेवा

क्वालालंपूर : आपल्या घराजवळच आपण जिथे काम करतो ते ऑफिस असेल, असे नसते. अनेक लोक नोकरीसाठी एका गावातून दुसर्‍या गावात ये-जा करीत असतात. त्यामध्ये अर्थातच बराचसा वेळ व पैसाही खर्च होत असतो; पण कुटुंबासमवेत आपल्या घरी राहण्याची सोय अशा ‘अप-डाऊन’ मुळे होते. सर्वसामान्यपणे कर्मचारी वर्ग ऑफिसला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. काही जण ऑफिस गाठण्यासाठी स्वत:चं वाहन वापरतात. पण, कोणी दररोज विमानानं ऑफिसला जात असेल का? ऑफिस गाठण्यासाठी आणि तिथून घरी परत येण्यासाठी कोणी दररोज विमानाचा वापर करत असेल का? या प्रश्नाचं उत्तर हो, असं आहे.

मलेशियात राहणारी एक भारतीय वंशाची महिला ऑफिस ते घर असा रोज 800 किलोमीटरचा विमानप्रवास काही वेळेत पूर्ण करते. मुलांना वेळ देता यावा, यासाठी या माऊलीची ही धडपड आहे! कुटुंब आणि घर ही तारेवरची कसरत सांभाळण्यासाठी मलेशियात राहणार्‍या रेचल कौर दररोज असा प्रवास करतात. हे अंतर त्या विमानानं कापतात. त्या सकाळी ऑफिसला जातात आणि रात्री घरी परततात. रेचल कौर त्यांच्या 2 मुलांसाठी दररोज असा हवाई प्रवास करतात. मुलांसोबत वेळ घालवता यावा. त्यांचा अभ्यास घेता यावा, हा त्यामागील हेतू. दररोज विमान प्रवास करत असल्यानं रेचल कौर यांचा खर्च प्रचंड वाढत असेल, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो; पण तसं नाहीये. विमानानं प्रवास करूनही त्यांचे बरेच पैसे वाचतात. एका यूट्यूब चॅनलनं कौर यांचा संपूर्ण दिनक्रम कव्हर केला आहे. कौर पहाटे 4 वाजता उठतात. मलेशियाच्या पेनांग शहरातून क्वालालंपूरला जाण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू होतो. क्वालालंपूरमध्ये वास्तव्य करण्यापेक्षा दररोज प्रवास करणं स्वस्त पडतं, असं कौर सांगतात.

रेचल रोज पहाटे 5 वाजता घर सोडतात. सकाळी 5.55 मिनिटांनी त्या विमानात चढतात. विमान प्रवासाचा अवधी 30 ते 40 मिनिटांचा असतो. सकाळी 7.45 च्या सुमारास त्या ऑफिसला पोहोचतात. सुरुवातीला कौर यांनी कुटुंबापासून दूर क्वालालंपूरला राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या केवळ शनिवारी आणि रविवारी कुटुंबासोबत वेळ घालवायच्या. पण, क्वालालंपूरमधील वास्तव्य खर्चिक होतं. त्यासाठी सरासरी 747 अमेरिकन डॉलर इतका खर्च यायचा. आता रेचल दररोज विमानानं प्रवास करून ऑफिस गाठतात. त्यासाठी येणारा खर्च केवळ 316 यूएस डॉलर आहे. विमानतळाहून ऑफिसला पोहोचण्यासाठी त्यांना केवळ 5 ते 7 मिनिटं लागतात. त्या एअर एशियामध्ये काम करतात. दररोजच्या प्रवासाचा खर्च त्या स्वत:च्या खिशातून करतात. पण, एअरलाईन्सच्या कर्मचारी असल्यानं त्यांना कंपनीकडून बरीच सवलतही मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT