Medieval Shoe Discovery | गिधाडाच्या घरट्यात 750 वर्षांपूर्वीचे ‘मध्ययुगीन चप्पल’ Pudhari File Photo
विश्वसंचार

Medieval Shoe Discovery | गिधाडाच्या घरट्यात 750 वर्षांपूर्वीचे ‘मध्ययुगीन चप्पल’

पुढारी वृत्तसेवा

बार्सिलोना : दक्षिण स्पेनमधील एका कड्याच्या गुहेत गिधाडाच्या घरट्याचा अभ्यास करणार्‍या संशोधकांना एक अत्यंत अनपेक्षित वस्तू सापडली आहे, ती म्हणजे मध्ययुगीन काळातील गवतापासून बनवलेली एक चप्पल. शेजारील घरट्यांच्या पुढील तपासणीत असे दिसून आले की, अनेक पिढ्यांच्या गिधाडांनी त्यांच्या घरट्यांमध्ये इतर ऐतिहासिक वस्तू, जसे की चामड्याचे तुकडे, कापड आणि दोर्‍याचे धागे, वापरून सजावट केली होती.

पायरेनियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजीचे (CSIC) पर्यावरणशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक, अँटोनी मार्गालिडा यांनी सांगितले की, ‘या गुंफांच्या चांगल्या स्थितीमुळे वस्तू शेकडो वर्षांपासून टिकून राहिल्या आहेत, याचा अर्थ ही घरटी वास्तविक नैसर्गिक संग्रहालये आहेत. ‘दाढीवाल्या गिधाडा’चा (Bearded Vulture - Gypaetus barbatus) अभ्यास करताना संशोधकांना हा शोध लागला. ही प्रजाती 70 वर्षांपूर्वी दक्षिण स्पेनमधून स्थानिक पातळीवर नामशेष झाली होती. ही गिधाडे एकाच ठिकाणी अनेक पिढ्यांसाठी घरटी पुन्हा-पुन्हा वापरतात, ज्यामुळे त्यांची घरे हाडे, गवत, काड्या आणि त्यांनी जमा केलेल्या वस्तूंनी बनलेल्या अनेक थरांची बनलेली असतात.

‘इकॉलॉजी’ (Ecology) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी अभ्यास केलेल्या डझनभर गिधाडांच्या घरट्यांमध्ये सापडलेल्या वस्तूंचा तपशील दिला आहे. हाडे : घरट्यांमध्ये सापडलेल्या वस्तूंमध्ये सर्वाधिक हाडे होती, त्यासोबत इतर प्राण्यांचे खूर आणि अंड्याची कवचेदेखील मिळाली. मानवनिर्मित वस्तू : अंदाजे 9 टक्के अवशेष मानवाद्वारे बनवलेल्या वस्तूंचे होते. यात एका धनुष्याचा बाण, 72 चामड्याचे तुकडे, 129 कापडाचे तुकडे आणि 25 एस्पार्टो गवतापासून बनवलेल्या वस्तू होत्या, ज्यात एका चप्पलचा समावेश होता. एस्पार्टो गवत हजारो वर्षांपासून चप्पल बनवण्यासाठी वापरले जाते.

आजच्या एस्पॅड्रिल्स नावाच्या चपलांचे लवचिक तळवे याच गवतापासून बनवलेले असतात. मध्ययुगीन स्पेनमध्ये गरीब शेतकर्‍यांमध्ये ‘एस्पॅड्रिल्स’ चप्पल सामान्यपणे वापरली जात होती. संशोधकांनी जेव्हा गवताच्या चप्पलचे कार्बन-डेटिंग केले, तेव्हा ती जवळपास 750 वर्षांपूर्वीची असल्याचे निष्पन्न झाले. मार्गालिडा यांच्या मते, या गिधाडांनी 13 व्या शतकातील अनपेक्षितपणे वाटेत भेटलेल्या शेतकरी किंवा लोकांकडून या वस्तू गोळा केल्या असाव्यात; त्यांनी कोणतीही पुरातत्त्वीय स्थळे लुटली नसावीत.

मध्ययुगीन चप्पल सापडलेल्या त्याच घरट्यात लाल रंगाच्या गेरूने रंगवलेल्या मेंढीच्या चामड्याचा एक तुकडाही मिळाला. कार्बन डेटिंगनुसार, तो तुकडा 726 वर्षांपूर्वीचा आहे, जो चप्पलच्या वयाएवढाच जुना आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारे जमा केलेल्या वस्तूंची गिधाडाची घरटी पुरातत्त्वशास्त्रज्ञांसाठी माहितीचा खजिना ठरू शकतात; कारण स्थिर तापमान आणि कमी आर्द्रता असलेल्या गुंफांच्या त्यांच्या स्थानामुळे सेंद्रिय अवशेष चांगल्या प्रकारे जतन केले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT