world travel 72 countries | वयाची 74 वर्षे आणि 72 देशांची एकट्याने सफर! 
विश्वसंचार

world travel 72 countries | वयाची 74 वर्षे आणि 72 देशांची एकट्याने सफर!

ब्रिटिश महिला पर्यटकाचे चीनमध्ये जंगी स्वागत

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : जिद्द आणि उत्साहाच्या जोरावर वयाचे बंधन झुगारून देता येते, हे एका 74 वर्षीय ब्रिटिश महिलेने सिद्ध केले आहे. जगातील 72 देशांची एकट्याने सफर केल्यानंतर ही महिला चीनमध्ये पोहोचली असता, स्थानिक लोकांनी तिचे जे स्वागत केले, त्याने इंटरनेटवरील हजारो लोक भारावून गेले आहेत.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘गिल’ नावाच्या या धाडसी महिलेची कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यांच्या या साहसाला जगभरातून दाद मिळत आहे. नैऋत्य चीनमधील ‘हेझोऊ’ येथील विद्यापीठाचा विद्यार्थी शियाओ यू, फुकेतमध्ये स्वयंसेवा करत असताना गिल यांना भेटला. गप्पांदरम्यान शियाओला समजले की, 74 वर्षीय गिल यांनी आतापर्यंत जगातील 72 देशांची एकट्याने सफर केली असून, अनेक ठिकाणी त्यांनी समाजसेवादेखील केली आहे. त्यानंतर काही दिवसांनी गिल चीनमध्ये येत असल्याचा ई-मेल शियाओला मिळाला आणि त्याने त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

3 एप्रिल रोजी शियाओने गिल यांची ‘गुइलिन’ शहरात भेट घेतली. त्याने त्यांना तेथील प्रसिद्ध ‘एलिफंट ट्रंक हिल’ आणि ‘डिएकाई हिल’ची सफर घडवून आणली. त्यांनी स्थानिक राईस, नूडल्सचा आस्वाद घेतला आणि अनेक फोटोही काढले. शियाओने सांगितले की, गिल यांना आजच्या तरुण पिढीप्रमाणे मोबाईल अ‍ॅप्स वापरणे फारसे जमत नव्हते. त्यांना नेहमी आपल्या मोबाईलची बॅटरी संपेल की काय, अशी भीती वाटायची. ‘त्यांच्या या स्वभावामुळे मला माझ्या आजीची आठवण झाली,’ अशा भावना शियाओने व्यक्त केल्या.

गिल सध्या चीनच्या एक महिन्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्या या प्रवासात ग्वांगझोऊ, चेंगदू, शियान, हांगझोऊ, शांघाय आणि बीजिंग यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी एका टुरिस्ट ग्रुपची मदत घेतली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या ‘लू यान’ नावाच्या स्थानिक गाईडने सांगितले की, ग्रुपमधील प्रत्येक सदस्य गिल यांची विशेष काळजी घेतो आणि सर्वांनाच त्या खूप आवडतात. शियाओने ऑनलाईन एक संदेश शेअर करून चीनमधील नागरिकांना विनंती केली आहे की, जर त्यांना प्रवासात गिल कुठेही भेटल्या, तर त्यांना शक्य ती मदत करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT