कैरो : एका नव्या अभ्यासानुसार, अनेक दशके जुन्या एका छायाचित्राच्या नव्या विश्लेषणातून सुमारे ५,००० वर्षांपूर्वी इजिप्तवर राज्य करणाऱ्या एका अत्यंत शक्तिशाली महिलेविषयी नवी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ‘मर्टनेथ’ (किंवा मरणेथ) नावाच्या या महिलेने इजिप्तच्या पहिल्या राजवंशादरम्यान सत्ता सांभाळली होती. इजिप्त एकाच राजाच्या छत्राखाली एकत्र आल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात तिचा कार्यकाळ होता. ‘प्राग इजिप्तोलॉजिकल स्टडीज’ या नियतकालिकाच्या सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, एका हरवलेल्या ऐतिहासिक वस्तूच्या ७२ वर्षांपूर्वीच्या म्हणजेच १९५४ मधील फोटोला आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक स्पष्ट करण्यात आले. या विश्लेषणातून मर्टनेथचे नाव अशा विशेष पद्धतीने लिहिले असल्याचे स्पष्ट झाले, ज्या पद्धतीचा वापर केवळ इजिप्तच्या शासकांसाठीच केला जात असे.
हा महत्त्वाचा शोध तब्बल ७० वर्षांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर लागला आहे. १९४० च्या दशकात पुरातत्त्व शास्त्रज्ञ विल्यम बी. एमेरी यांना ‘सक्कारा’ येथील एका थडग्याच्या तोंडाजवळ चिखलाची १३ झाकणे सापडली होती, ज्यांचा वापर वस्तूच्या मालकाची ओळख पटवण्यासाठी केला जात असे. यातील प्रत्येकावर चार ‘सेरेख’चा (इजिप्तच्या राजाचे नाव दर्शवणारी चिन्हे) समूह होता. एमेरी यांनी यातील दोन ‘सेरेख’ हे ‘जेर’ (Djer) नावाच्या राजाचे असल्याचे स्पष्ट केले, तर उर्वरित दोन ‘मर्टनेथ’ नावाच्या महिलेचे असावेत, असा अंदाज वर्तवला.
‘सेरेख’मध्ये मर्टनेथचे नाव असणे हेच ती इजिप्तची शासक होती याचे संकेत देते, असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी १९५४ मध्ये एका जर्नलमध्ये यातील एका चिखलाच्या झाकणाचा कृष्णधवल फोटो प्रकाशित केला होता. मात्र, त्या फोटोच्या खराब गुणवत्तेमुळे अनेक शास्त्रज्ञांचे यावर समाधान झाले नव्हते. या तपासात सर्वात मोठी अडचण अशी निर्माण झाली की, उत्खननानंतर ती सर्व १३ चिखलाची झाकणे आणि त्या फोटोची मूळ काचेची प्लेट गायब झाली. या नव्या शोधनिबंधाच्या सहलेखिका आणि ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी युनिव्हर्सिटीच्या इजिप्तोलॉजी संशोधक सुसान केली यांनी सांगितले की, या ऐतिहासिक वस्तू सध्या कुठे आहेत याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.