वॉशिंग्टन : जरा विचार करा... जंगलात भीषण आग लागली आहे, चोहोबाजूला धुराचे लोट पसरले आहेत आणि अचानक या वणव्यातून तुमचा जीव वाचवण्यासाठी ७ फूट लांब, चार पायांचा असा एक रोबो बाहेर येतो, ज्याच्या डोक्यावर शिंगे आहेत आणि हातात चालती करवत... पहिल्या नजरेत कोणालाही वाटेल की, हा एखाद्या हॉरर चित्रपटातील भयानक राक्षस आहे! असाच काहीसा भीतिदायक दिसणाऱ्या रोबोचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहून लोक थक्क झाले आहेत. अनेक यूजर्स तर याला ‘शैतानी जीव’ म्हणत आहेत. परंतु, या भीतिदायक दिसणाऱ्या रोबोचा उद्देश विनाश घडवणे नाही, तर माणसांचे प्राण वाचवणे हा आहे.
सामान्यतः, बचाव आणि मदत कार्यात वापरल्या जाणाऱ्या रोबोंचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एका फ्रेंडली किंवा साध्या मशिनची प्रतिमा येते. मात्र, कॅलिफोर्नियातील ‘Satyress’ या टेक कंपनीने याहून पूर्णपणे वेगळा ‘थ्रीहाल्व्हस्’ (Threehalves) नावाचा रोबो प्रोटोटाईप तयार केला आहे. मानवासारख्या दोन पायांच्या रोबोऐवजी ‘थ्रीहाल्व्हस्’ला ४ पायांची ‘सेंटॉर’ बॉडी देण्यात आली आहे, ज्यामुळे खडबडीत आणि कठीण रस्त्यांवर त्याला उत्तम समतोल मिळतो. याच्या वरच्या भागात मानवासारखी शरीररचना असून, त्याला बदलता येणारे (Swappable) हात बसवले आहेत.
गरजेनुसार या हातांमध्ये करवत, ड्रिल मशिन किंवा रिंचसारखी अवजारे जोडली जाऊ शकतात. हा रोबो सुमारे ७ फूट लांब आहे आणि कोणत्याही सर्वसाधारण पिकअप ट्रकमध्ये लोड करून सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. हा रोबो पूर्णपणे स्वयंचलित नाही. एखादी व्यक्ती कॅमेरे, सेन्सर्स आणि जॉयस्टिकच्या साहाय्याने सुरक्षित अंतरावर बसून याला कंट्रोल करेल, जसे ड्रोन उडवला जाताे. तसेच, याच्या डोक्यावर दिसणारी शिंगे ही केवळ दाखवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी दिलेली नाहीत. या शिंगांच्या आत विशेष कॅमेरे बसवले आहेत, जे काम करताना रोबोला स्वतःच्या हातांवर आणि अवजारांवर लक्ष ठेवण्यास मदत करतात.
कंपनीचे संस्थापक ब्यू जी. यांच्या मते, कॅलिफोर्नियातील टाहो नॅशनल फॉरेस्टजवळ वादळानंतर कोसळलेली झाडे हटवताना निर्माण होणारे धोके पाहून त्यांना या रोबोची कल्पना सुचली. हा रोबो अशा ठिकाणी काम करेल, जिथे मानवी जीवाला मोठा धोका असतो; जसे की : विजेच्या तारांजवळील धोकादायक झाडांची छाटणी करणे. जंगलातील आगीच्या वेळी रस्ता मोकळा करणे. भूस्खलन किंवा कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात रेस्क्यू ऑपरेशन चालवणे. कंपनी हा रोबो मदतीसाठी बनवत असली, तरी त्याच्या भीतिदायक लूकमुळे सोशल मीडियावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सत्यारेस कंपनीने या प्रोटोटाईपच्या सुट्या भागांवर आणि उपकरणांवर १,५०,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे १.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. मात्र, याच्या अधिकृत लाँचिंग आणि किमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.