न्यूयॉर्कः एखाद्या दुकानात किंवा मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने पोहोचणे हे तुम्ही कदाचित चित्रपटांमध्येच पाहिले असेल. परंतु, अमेरिकेत एका ६९ वर्षांच्या वृद्धाने ही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवली आहे. विस्कॉन्सिन येथील या व्यक्तीने आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कारने जाण्याऐवजी स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर बाहेर काढले आणि थेट एका ‘आऊटडोअर सप्लाय स्टोअर’च्या पार्किंगमध्ये लँड केले!
पार्किंगमध्ये गाडीऐवजी थेट हेलिकॉप्टर उभे असलेले पाहून तेथील लोक थक्क झाले आणि अनेकजण या अनोख्या दृश्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद करू लागले. ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील ‘रिचफिल्ड’ गावातील आहे. ६९ वर्षांच्या या आजोबांनी रोसेंडेल गावातून उड्डाण केले होते आणि ते थेट ‘कॅबेला’ नावाच्या दुकानाच्या पार्किंगमध्ये उतरले. जेव्हा वॉशिंग्टन काऊंटी शेरीफ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हेलिकॉप्टरने येण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी अत्यंत साधे उत्तर दिले. ‘हायवेवरून गाडी चालवत येण्यात खूप वेळ जात होता, ड्राईव्ह खूप लांब होती; म्हणून मी हेलिकॉप्टरनेच आलो!’
दुकानाच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिळताच शेरीफचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लोकांना वाटले की, कदाचित काही मोठी अडचण किंवा नियमांचे उल्लंघन झाले असावे. मात्र, चौकशीनंतर खरी गोष्ट समोर आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैमानिकाकडे सर्व आवश्यक परवाने होते आणि त्यांनी अतिशय सुरक्षितपणे लँडिंग केले होते. त्याने नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन केले होते. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा कोणताही दंड ठोठावण्यात आला नाही. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून, लोक मजेशीर कमेंटस् करत आहेत.