कोपेनहेगन (डेन्मार्क) : खगोल शास्त्रज्ञांनी समुद्राच्या तळाशी 15 व्या शतकातील एका महाकाय जहाजाचा शोध लावला आहे. ‘स्वेलगेट 2’ असे नाव देण्यात आलेले हे जहाज ‘कॉग’ प्रकारातील आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सापडलेल्या कॉग जहाजांपैकी हे सर्वात मोठे जहाज असल्याचे मानले जात आहे. कोपेनहेगनमध्ये समुद्राजवळ सुरू असलेल्या एका बांधकामादरम्यान पाण्याखालील तपासणी करताना हे ऐतिहासिक जहाज शास्त्रज्ञांच्या हाती लागले.
हे जहाज सुमारे 28 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद आहे. याची उंची 6 मीटर म्हणजेच साधारणपणे दोन मजली इमारतीइतकी आहे. 600 वर्षांपूर्वी उत्तर युरोपमध्ये व्यापारासाठी अशाच प्रकारच्या जहाजांचा वापर केला जात असे. युरोपमधील मोठी शहरे वसवण्यासाठी लाकूड, मीठ आणि अन्नधान्यासारख्या जड वस्तूंची ने-आण करण्यासाठी हे जहाज बनवण्यात आले होते. या जहाजाची वैशिष्ट्ये पाहून शास्त्रज्ञ चकित झाले आहेत.
रचना : जड सामान वाहून नेण्यासाठी याचे खालचे भाग चपटे आणि भिंती उंच ठेवण्यात आल्या होत्या.
वेग : वार्याच्या सहाय्याने सहज प्रवास करण्यासाठी याला एक मोठे ‘पाल’ लावले होते.
कमी मनुष्यबळ : या जहाजांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे चालवण्यासाठी फार कमी लोकांची गरज पडत असे, पण ते प्रचंड प्रमाणात माल वाहून नेण्यास सक्षम होते. जेव्हा शास्त्रज्ञांनी या जहाजाच्या लाकडाची चाचणी केली, तेव्हा एक रंजक बाब समोर आली. या जहाजाच्या बांधकामासाठी विविध देशांतील लाकूड वापरले गेले होते. जहाजाचे बाहेरील तक्ते पोलंडच्या जंगलातून आणले होते, तर जहाजाचा आतील सांगाडा नेदरलँडस्मधील लाकडापासून बनवला होता. हे त्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उत्तम उदाहरण आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या चिखलाच्या आणि मातीच्या जाड थरामुळे हे लाकडी जहाज सडण्यापासून वाचले. जहाजाचा एक भाग इतका सुरक्षित आहे की, त्या काळातील दोरखंड देखील आजही सुस्थितीत सापडले आहेत.