नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. ‘युगव्ह’ (YouGov) च्या एका ताज्या अहवालानुसार, भारतीयांची इंटरनेटवर माहिती शोधण्याची (Online Search) पद्धत पूर्णपणे बदलली आहे. माहिती शोधण्यासाठी आता एआय असिस्टंट हा भारतीयांचा एक अत्यंत विश्वासू प्लॅटफॉर्म बनला आहे. विशेष म्हणजे, एआय सर्च इंजिनची जागा घेण्याऐवजी, माहिती शोधण्याचा अनुभव अधिक सोपा आणि चांगला करत आहे. 'हाऊ एआय इज चेंजिंग ऑनलाईन डिस्कव्हरी इन २०२६’ या अहवालानुसार, भारतातील ६० टक्के लोक आता इंटरनेटवर काहीही शोधण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात थेट एखाद्या एआय असिस्टंट (चॅटबॉट) च्या मदतीने करतात.
भारतातील शहरी भागांमध्ये ऑनलाईन सर्च करणाऱ्या तब्बल ८९ टक्के लोकांनी कबूल केले आहे की, ते कोणत्याही प्रकारची माहिती शोधण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एआय असिस्टंटचा वापर करतात. यामुळे एआय सर्चचा वापर वेगाने वाढवणाऱ्या जगभरातील देशांमध्ये भारत अग्रस्थानी पोहोचला आहे. युवा पिढीचा कल : हा ट्रेंड तरुणांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळत आहे. सुमारे ६७ टक्के जेन झी आणि ६५ टक्के मिलेनियल्स त्यांच्या रोजच्या किमान एका सर्चसाठी एआय असिस्टंटचा वापर करतात. वयस्कर किंवा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. जरी ‘एआय’ चा वापर वाढला असला, तरी त्याने गुगलसारख्या पारंपरिक सर्च इंजिनला पूर्णपणे बाजूला केलेले नाही.
२७ टक्के लोक ऑनलाइन सर्चसाठी ‘एआय’ ला आपले प्राथमिक किंवा पहिले माध्यम मानतात. ३६ टक्के लोक आधी पारंपरिक सर्च इंजिन किंवा इतर स्रोतांवरून माहिती घेतात आणि नंतर ‘एआय' चा वापर करतात. २६ टक्के लोग माहितीच्या इतर माध्यमांसोबतच एक पर्याय म्हणून ‘एआय' चा वापर करतात. ‘एआय' असिस्टंटने दिलेल्या उत्तरावर युजर्सचा विश्वास किती आहे, हे खालील आकड्यांवरून समजते : ३३ टक्के युजर्स ‘एआय' ने दिलेल्या उत्तरासोबतच्या लिंकवर क्लिक करून पुढे जातात. १९ टक्के युजर्स मिळालेली माहिती खरी आहे की नाही, हे पाहण्यासाठी इतर वेबसाईटशी तिची तुलना करतात. २८ टक्के युजर्स ‘एआय' कडून उत्तर मिळाल्यानंतर पुढे कोणतीही सर्च करत नाहीत (म्हणजेच ते त्या उत्तराने समाधानी होतात). यावरून ‘एआय’ लोकांच्या गरजा थेट पूर्ण करत असल्याचे स्पष्ट होते.