बीजिंग : चीनच्या शांक्सी प्रांतातील यूलीन शहराजवळील डोंगराळ भागात पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एक मोठा आणि महत्त्वाचा शोध लावला आहे. त्यांना या परिसरात दगडांनी बांधलेल्या किल्ल्यांसारख्या 573 प्राचीन मानवी वस्त्यांचे अवशेष सापडले आहेत. यापैकी अनेक किल्ले सुमारे 2800 ईसा पूर्व म्हणजेच जवळपास 5,000 वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जात आहेत. यामुळे एका प्राचीन सभ्यतेच्या खुणा मिळाल्या आहेत.
या किल्ल्यांपैकी काही अवशेष यांगशाओ काळातील आहेत, जो 2800 ईसा पूर्व पासून सुरू होतो. याशिवाय, काही किल्ले शांग राजवंशाच्या (1600 ते 1046 ईसा पूर्व) आणि झोउ राजवंशाच्या (1046 ते 221 ईसा पूर्व) काळातले देखील आहेत. हा शोध चीनमधील जुना समाज आणि त्यांच्या राहणीमानाची पद्धत समजून घेण्यासाठी मदत करेल. पुरातत्त्व चमूने या संपूर्ण भागात सुमारे सहा वर्षे संशोधन केले. प्राचीन काळात लोक पाण्याच्या जवळच वस्ती करत असल्याने, चमूने नदी आणि पाण्याच्या स्रोतांभोवती शोध सुरू केला.
पाण्याचे मार्ग दर्शवणारे नकाशे आणि ड्रोनचा वापर करून या वस्त्यांचा शोध लावण्यात आला. या सर्व वस्त्या दगडांनी वेढलेल्या होत्या, यावरून हे स्पष्ट होते की, येथील लोक सुरक्षेबद्दल खूप जागरूक होते. काही ठिकाणी दगडांच्या भिंतींनी वेढलेले मोठे किल्ले सापडले, तर जवळच भिंती नसलेल्या सामान्य लहान वस्त्या देखील मिळाल्या. यावरून हे सूचित होते की, मोठे किल्ले समाजाचे केंद्रस्थान होते आणि छोटे गावे त्यांच्यावर अवलंबून राहत होते. या 573 किल्ल्यांचा आकार आणि रचना एकमेकांपेक्षा वेगळी आहे. काही किल्ले खूप साधे होते, तर काहीमध्ये आत अनेक भाग आणि खोल्या बनवलेल्या होत्या.
संशोधकांचे म्हणणे आहे, बांधकामातील हा फरक दर्शवतो की, वेळेनुसार बांधकामाची पद्धत आणि संस्कृती बदलत गेली. तसेच, यातून त्या समाजात उच्च-नीच दर्जाची सामाजिक व्यवस्था अस्तित्वात असल्याचेही दिसून येते. हा शोध चीनमधील प्राचीन संस्कृतींना समजून घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. पाण्याजवळ वसवलेल्या या किल्ल्यांवरून युद्ध, सुरक्षा आणि समाजाच्या विकासात किल्ल्यांची काय भूमिका होती, हे स्पष्ट होण्यास मदत होईल. तज्ज्ञांचा विश्वास आहे की, हा शोध चीनच्या इतिहासातील अनेक रहस्ये उलगडेल आणि त्या वेळी वापरल्या जाणार्या संरक्षण व्यवस्था व नगर वसवण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती देईल.